वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
कजेर
कोकणातील प्रत्येक समुद्र किनारी कजेर आढळते. विशेषतः समुद्राला उधाणी भरती आली की चार तासाच्या अंतराने ओहोटी आणि भरतीच्या लाटांसमवेत किनारी आलेला जो काट्याकुट्यानी रचलेला समुद्री कचऱ्याचा ढीग दिसतो त्यांस कोकणातील लोक विशेषकरून किनारी राहणारे रहिवासी त्यांस ‘कजेर' असे म्हणतात. महिन्यातून दोन वेळा हा कचरा मोठ्या प्रमाणात हमखास किनारी येतोच येतो. त्याचा ढीग साचलेला अधूनमधून दिसतोच. कारण अमावस्या आणि पौर्णिमेला पूर्ण दर्याभरती असते, हे भौगोलिक सत्य होय.
उधाणाचा जोर तसा कधी जास्त कधी कमी असू शकतो. जेव्हा समुद्र शांत असतो (दिसतो) तेंव्हा वरवर जरी लाटांचा उफाळ कमी असला तरी पाण्याचा फैलाव वाढतो. त्यांस ग्रामिण बोलीत पाण्याचा करंट असं म्हणतात. त्यामुळे भरतीच्या लाटांनी किनारी वाहून आलेला कचरा हा कुठे ना कुठेतरी पुळणीत ढकलून देण्याचे काम या एरव्ही शांत दिसणाऱ्या लाटा सहज करून जातात. कोकणांत यास खोचक बोलीत एक मस्त म्हण आहे...
‘इधर की उखली उधर को ढकली...मी बाय मोकळी के मोकळी...!'
अमावस्येला सुर्यास्त होतांना समुद्र बराचसा बाहेर गेलेला दिसतो. लकाकणारी पुळण सूर्यप्रकाशात मुक्त श्वास घेत असते. तेव्हा जर किनाऱ्यावर पायीं चालत गेलो की समुद्रातील दडलेली अनेक देखणी शिल्पं पुळणीत (समुद्री मातीला पुळण म्हणतात) अर्धी चिकटुन दिसतात. एरवी हौशी लोकांचा हा विरंगुळा असतो, पोफळीच्या (सुपारी) विरितून ती शिल्पं गोळा केली जातात. शिवाय ओल्या पुळणीवर काही तरुण जोडपी आपापली नावं लिहितात. नक्षीकाम करतात. देवाचे फोटो काढतात. सुविचार लिहितात. अगदिच लाडावलेली प्रेयसी आपल्या प्रेमीला विचारते...
"हे रेतीत कोरलेलं माझं नाव किती काळ टिकणार?”
प्रेमी हसतो व लगेच आठवलेला उर्दू शेर चिकटवतो.....
"रेत पे लिखा नाम
भला कबतक टीका है...?”
हे ऐकताच खोलवर गेलेल्या समुद्रापर्यंत आपली दृष्टी नेत प्रेमिका कसल्यातरी भावनिक विचारात डूबुन जाते.इथवर समुद्राने स्वच्छ धुवुन ठेवलेल्या पुळणीत अनवाणी चालताना मन खरंच खूप रमतं, वेळ मजेत जाते. पण जसजसे आपण वाळलेल्या पुळणीकडे येऊ लागतो तसतसा समुद्री कचऱ्याचा तो ढीग पुळणीत अर्धवटच गाडला गेलेला दिसतो. बारीक निरीक्षण केल्यास त्यामध्ये प्रामुख्याने दिसतात त्या बारीक पण टणक अशा काठ्या...(ग्रामीण बोलीत - काटक्या), खाजण रानातील खारफुटीची गळून पडलेली फांदी शेवटी लाटे समवेत किनारा गाठतेच. त्यांतच मच्छीमारानी बोटीतून टाकून दिलेली फाटकी जाळी असतात. त्याशिवाय काचेच्या बाटल्या, नको असलेला प्लस्टिकचा जमावडा, इस्पितळात वापरून झालेल्या निकामी सलाईनच्या पिशव्या, फायबरची बुचे, रबरी चपला आणि असं बरंच काही असतं ज्यांस कचरा समजून जलसमाधी दिली जाते; पण समुद्र आपल्या गर्भात काहीच ठेवत नाही. सव्याज किनारी नेऊन ठवतो.
त्यातच वाहून आलेल्या लाकडी फळ्या, कडया, नारळी सोळणी आणि प्रत्यक्षात नारळही वाहून त्या ढिगाऱ्यात जाऊन दडलेले असतात. महागड्या दारूच्या रिकाम्या बाटल्याचा तर खच पडलेला असतो. एकदां तर चक्क नवीन चपलांचा खच किनारी लागला होता. अनेकांनी तो उचलून आपल्याला होतो का? ते पाहण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने सर्व चपला एकाच पायाच्या निघाल्या. आणि फॉरेनच्या हवाई चपला साऱ्यानाच चक्क लल्लू करून गेल्या. कजेर तशी दोन प्रकारची असते. हे पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्षांत पाहिलेलं, अनुभवलेलं आहे. पावसाळ्यात दोन ते तीन वेळां नदीला आऊर (पूर) येतोच. डोंगराळ उतारावरून येणाऱ्या पाण्यासमवेत रानातला कचराही वाहून येतो. ती कजेर येऊन पुळणीत अडकली की त्याचा अन्न शिजवण्यास चांगला उपयोग होतो पण मॉन्सून व्यतिरिक्त किनाऱ्यावर वाहून आलेली कजेर ही खारट असते. कालांतराने त्यावर साचलेलं मीठही दिसते. त्या कजेरीचा उपयोग गारव्यात शेकोटी पेटविण्यासाठी म्हणून केला जातो. घराशेजारील मच्छर पळवण्यासाठी म्हणूनही या कजेरीचा उपयोग होतो, ज्यामध्ये चिमुटभर लोबाण टाकल्यास परिसर सुगंधित होतो.
असंच एकदा किनारी पुळणीत नेहमीप्रमाणे एकटाच बसलो होतो. तासाभरात तिन्हीसांजेची वेळ होणार म्हणून पाण्यांत जावं का? ह्याच विचारांत होतो की अचानकपणे गावातीलचं एक व्यक्ती खांद्यावर सीमेंटच्या बोरीत काहितरी  घेऊन येताना दिसली. थकल्यामुळे कदाचित माझ्याच समोर येऊन बसली. हनिफ बाबा त्याचे नाव. माणूस मोलमजुरी करून कौटूंबिक गाडा चालवणारा. जफाकश माणूस. फुकटची चौकशी करण्यांत काय उपयोग? इतक्यांत तोच बोलू लागला...
"तुला ठावं हाय, बोरीत काय हाय? ओळख पाहू...”
मी हसलो. कामावरचे कपडे, मळकट दाढी, समोरचे दंतफाटक पार मोकळे झालेले. धड त्यांस हसताही येईना. शब्दांना आकार देत बोलताही येईना. माझ्याकडे बघता-बघता तो बोरीतून एक- एक वस्तू बाहेर काढून दाखवू लागला. इंपोर्टेड दारूच्या/बिअरच्या देखण्या बाटल्या, घरगुती प्लस्टिकच्या अनेक अशा टाकाऊ वस्तू, फायबरच्या टाकाऊ वस्तू, ॲल्युमिनियमची नासलेली भांडी. असा बराचसा ‘ओळखीचा खजिना' त्यानें काढून दाखवला. ते सगळं पाहून मला सुचेना, मी प्रतिक्रिया काय द्यावी. तरीही त्यांस अगदीच वाईट वाटू नये म्हणून सहजपणे विचारले.
"हे घरी नेऊन तू काय करणार ?”
"हिच तर गंमत आहे. माझी जगण्याची पद्धत फार वेगळी आहे. अशा अनेक टाकाऊ वस्तु मला कजरीत सापडतात. शोधल्या शिवाय नाही कळणार, काय आहे त्या कचऱ्यात. अशा मौलिक वस्तू महिन्याभरात गोळा करून थेट भंगारवाल्यास विकणार. त्या पैश्यातून माझं महिन्याचे वीजबिल भरून टाकतो...ही आहे माझी जगण्याची पद्धत. कशी वाटली?”
हनिफ बाबा हा मोलमजुरी करून कोटूंबिक प्रपंच चालवणारा अवलिया खरंच डोकॅलीटी वापरून वीजबिल भरण्याचे जबाबदारीचे काम तो अश्या मेहनतीने पूर्ण करत होता. शिवाय कजेरसुद्धा तो उचलून घरच्या आवश्यात घेऊन जायचा. ज्यामुळे घरांतील इंधनाची बचत तो करत होता. शिवाय उधाणामुळे किनारी आलेला प्लास्टिक व काचेचा कचराही स्वच्छ करत होता. उदाहणार्थ आंघोळीसाठी पाणी चुलीवर तापवणे, इतर कांही गरजेच्या वस्तू चुलीवर शिजवणे, ही कामे तो पदरचा एकही पैसा खर्च न करता या टाकाऊ कजेरीपासून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करत होता. माणसाला किफायतशीरपणे जगता येतं, फक्त शासनाच्या नांवे बोटं मोडण्यापेक्षा, स्वतःसाठी श्रम घेतल्यास इंधनाची बचत होते, विजेची बचत होते. हे कोळथर या गावच्या हनिफ बाबाने स्वकर्तुत्वाने सिद्ध केले आहे. कांही लोक त्याची चेष्टा करत असतील, पण असा स्वावलंबी माणूस आज जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर असला तरीही अजून त्याची जिद्द गेलेली नाही. (गावात त्याला उपाहासाने खैरी गेली नाही असे म्हणतात).
महागडी पुस्तकं, शैक्षणिक क्रॅश कोर्सेस, नानाविध जगण्याच्या अनेक कला सर्वांना जमत असतील, पण ग्रामीण भागातील कांही जिद्दी लोकांकडून बरंच काही शिकता येतं जे पुस्तकांत लिहिलेलं नसेल, क्रॅश कोर्सच्या सिलॅबसमध्ये तर निश्चित नसेल. जगणं एक कला आहे, टाकाऊतून टिकाऊ ही कला सगळ्यांनाच जमते असं नाही. पण ज्याला जमते त्याचे गुणगान झाले पाहिजे. कजेर किनाऱ्यावर साचते ती गोळा करुन त्याचे इंधन म्हणून वापर केला जातो हे समुद्र किनारी राहणाऱयांनाच कळते. नकळतपणे पर्यावरण पूरक अशी ही कृती होय. कजेर म्हणजे नक्की काय? पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनारी भटकंती करतांना अनुभवावी. एक वेगळा विषय, वेगळी माहिती.
-इक्बाल शर्फ मुकादम