मच्छीमारांना मोंथा चक्रीवादळाचा फटका

उरण: अरबी समुद्रात आलेल्या मोंथा चक्रीवादळाचा उरण तालुक्यातील मच्छीमारांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप परतले आहेत. असले तरी मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी करंजा बंदरावर कोळी बांधवांशी संवाद साधत या नैसर्गिक संकटात तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत धीर मच्छीमारांना दिला. तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

मोंथा चक्रीवादळामुळे उरण तालुक्यातील ७ मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, २९ ऑवटोबर रोजी या सर्व बोटी आणि त्यावरील खलाशांशी संपर्क झाला असून सगळे सुखरुप असल्याची माहिती आ.  महेश बालदी यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, चक्रीवादळामुळे खोल समुद्रातून वाट काढत काही बोटी परत आल्या. यात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एक बोट समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्यावर जर नैसर्गिक आपत्तीमुळे परत यावे लागले, तर २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान होते. यावेळीही मच्छीमार बांधवांना त्याच प्रकारच्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

राज्य सरकारने नुकताच मच्छीमारांसाठी मोठा निर्णय घ्ोत मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही नैसर्गिक संकटात नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या धोरणामुळे कोळी बांधवांचे नुकसान भरुन निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे या संदर्भात झालेल्या नुकसानीचा अहवाल देऊन तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करणार आहे. अस्मानी संकटाच्या काळात कोळी बांधवांना आधार देणारे सरकार राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. आम्ही त्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा करु, असेही आ. महेश बालदी यांनी सांगितले.

यावेळी ‘मच्छीमार सोसायटी'चे चेअरमन प्रदीप नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयविन कोळी, नारायण नाखवा, उमेश भगत, महेंद्र कोळी, ऋषिराज कोळी, राजेंद्र नाखवा, मच्छिमार व्यावसायिक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उपवनमध्ये ५१ फुटी विठ्ठल मूर्तीचे अनावरण