वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
नवी मुंबईतील जनता दरबारात 404 निवेदने सादर
70 टक्के निवेदनांवर तात्काळ कार्यवाही
नवी मुंबई : वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ३० ऑक्टोबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात नागरिकांनी विविध विषयांवर 404 निवेदने सादर केली. पाणीटंचाई, सिडकोने धाडलेले नोटिसा व अन्य समस्यांचा समावेश होता. संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन 70 टक्के निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यात आला. उर्वरित निवेदनांचा समयबद्ध निपटारा करण्यात येणार आहे.
जनता दरबारामध्ये महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह शासकीय निमशासकीय आणि विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सानपाडा सह शहरातील अन्य भागातून आलेल्या नागरिकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना करून नामदार नाईक यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. ऐरोली, वाशी येथील नागरिकांनी त्यांना सिडकोने धाडलेल्या नोटीसींचा विषय उपस्थित केला असता कोणालाही नियमबाह्य नोटीसा न देण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले. सुनील पगार यांच्यासह नवी मुंबईतील कलाकारांनी विष्णुदास भावे नाट्यगृहातील तालीम हॉल सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नामदार नाईक यांनी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबईतील कलाकारांना हा तालीम हॉल आता १२०० रुपयांऐवजी ५०० रुपयांमध्ये सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल नवी मुंबईतील कलाकारांनी जनता दरबारामध्ये नामदार नाईक आणि नवी मुंबई पालिकेचे आभार व्यक्त केले.
पवन कोळी या युवकाला महावितरण मध्ये नोकरी मिळणार आहे. पवनचे वडील वीरेश कोळी यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या जागी नोकरी मिळावी यासाठी पवन प्रयत्न करीत होता. जनता दरबार मध्ये आल्यानंतर नामदार नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून सूचना दिल्यानंतर पवनला नोकरीवर घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बहुसंख्य प्रशासकीय अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक काम करतात. काही अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे जनतेची कामे प्रलंबित राहतात. अशा नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी जनता दरबार उपक्रम सुरू केल्याची प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिली. सकाळी १११ वाजता सुरू झालेला जनता दरबार रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होता.