वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
सरदार वल्लभभाई पटेल : भारताचे पोलादी पुरुष
स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल यांची गृहमंत्री म्हणून निवड झाली. त्यांना उप पंतप्रधान होण्याचादेखील मान मिळाला. गृहमंत्री असतानाच्या काळात हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे देशामध्येविलिनीकरण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांची प्रतिमा जनमानसात अधिकच उजळली. देशाची एकता,अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. आज त्यांची जयंती.
देशाच्या राजकीय अन्सामाजिक जीवनात पोलादी पुरुष (आयर्न मॅन) म्हणून ओळख असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात राज्याच्या खेडा जिल्ह्यातील करमसद येथे झाला अन् ब्रिटिश राजवटीला तगडं आव्हान देणारा जणू देशात पोलादी पुरुषच उदयास आला. वल्लभभाई यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर, आईचे लाडबाबेन. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा विवाह झवेरबा यांच्याशी झाला.त्यांना डाह्याभाई अन् मनिबेन ही दोन अपत्ये.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा व सत्याग्रह या तत्वांवर देशाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जो लढा उभारला गेला, त्यात वल्लभभाई हे अग्रस्थानी होते. या लढ्यादरम्यान त्यांना गांधीजीसह अनेक वेळा कारावास भोगावा लागला. त्यापूर्वी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली.परंतु भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी वकिली सोडून थेट स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर मोठा दबदबा होता. त्यांना राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषविण्याचा मान मिळाला.पारतंत्र्याच्या काळात शेतकऱ्यांवर जुलमी कर लादणाऱ्या ब्रिटिश सरकारविरुद्ध स्व.वल्लभभाई पटेल यांनी रणशिंग फुंकले.मिठाचा सत्याग्रह केल्याबद्दल इंग्रज पोलिसांकडून अटक झालेले ते प्रमुख नेते होते.महात्मा गांधी यांच्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.इतकेच नव्हे तर,विदेशी मालाची होळी करून सरदार पटेल यांनी खादीचे कपडे व स्वदेशी साहित्य वापरण्याचे भारतीयांना जाहीर आवाहन केल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते महान देशभक्त अन् लढवैये स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळेच त्यांना जनमानसाकडून पोलादी पुरुष ही उपाधी मिळाली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भरीव योगदानाबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांच्या नावाने विविध शैक्षणिक संस्था उभारल्या गेल्या.तसेच सरदार सरोवर डम, सरदार वल्लभभाई पटेल युनिव्हर्सिटी, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई त्यांचा Statue of Unity हा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला असून, त्याचे अनावरण ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. महत्वाचे म्हणजे ३१ ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणूनही साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. याशिवाय त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्रदीपक कामगिरीसाठी त्यांना भारतरत्न हा किताबही बहाल करण्यात आला.
जय हिंद!जय महाराष्ट्र!
- रणवीर राजपूत