स्मरणात राहिलेले  प्रा. डॉ. राम माने

२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मी फेसबुक पेज तयार केले. या पेजची सुरूवात माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योग्य दिशा देणारे प्रा. डॉ. राम माने यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने व्हावे ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना आहे.सरांना व मॅडम यांना जड अंतःकरणाने सर आणि मॅडम यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील माजी विभाग प्रमुख, माजी सिनेट सदस्य, माजी अधिसभा सदस्य, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचे माजी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, एक निर्मळ, सोज्वळ, मनाचा दिलदार माणूस, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आधार, एक हाडाचा शिक्षक व विद्यार्थ्यांना समजून घेऊन पुढे चालणारे नामांकित सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने सर आणि त्यांच्या पत्नी अडड. सौ. माने मॅडम रस्ता क्रॉस करताना पडेगाव परिसरात अपघाती निधन झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांद्वारे सकाळी कळाली. खूप दुःख झाले. ज्या प्राध्यापकांनी आपल्या सेवा काळात विद्यार्थ्यांना एवढी मदत केली त्यांचे असे दुर्दैवी अपघाताने जाणे मनाला पटणारे नाही.

२५ ऑक्टोबर २०२५ रोजी पडेगाव परिसरात डॉ. माने दांपत्य रस्ता ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात जाण्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. रामराव माने यांनी १९८० ते २०२४ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या अध्यापनशैलीत विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि विषयावरील गाढ प्रेम यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. मी १९९४-९५ ला एम. एस्सी. प्रथम वर्षात होतो तेव्हा सर माझ्या प्रात्यक्षिक बॅचचे समन्वयक होते. यामुळे ते मला चांगले परिचीत होते. २००४ मध्ये रिफ्रेशर कोर्स पूर्ण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असतांना मुद्दामहून त्यांना भेटण्यासाठी मी व योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राध्यापक स्व. डॉ. मधुकर गायकवाड सर त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. खूप चर्चा केली होती. मला त्यांच्या कडे पी. एच. डी. करायची खूप इच्छा होती, पण योग जूळून आला नाही. कोणतेही कठीण काम सरांकडे घेऊन गेलो तर सर ते काम होवू अथवा न होवो तरीही ते हसतमुखाने ते ऐकून घेत. हा त्यांचा विद्यार्थी प्रती सकारात्मक दृष्टीकोन नेहमीच असायचा. त्या विद्यार्थ्यास ते नाउमेद करायचे नाहीत. हा त्यांचा विद्यार्थी प्रति असलेला चांगला गुण कायम स्मरणात राहणारा आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून संशोधनपर लेख लिहिले. खूप विद्यार्थ्यांना पी. एच. डी. साठी मार्गदर्शक म्हणून भुमिका पार पाडली. अनेक लघु व दीर्घ प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली. त्यांचा नोकरीचा सुरूवातीचा काळ फार खडतर होता. पण तरीही ते कधी खचले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, पारदर्शकता आणि शैक्षणिक विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली.

त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. त्यांच्या अकाली निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात व असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील रुईभर या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. सरांना व मॅडम यांना माझ्या कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. - प्रा.डॉ.श्रीकृष्ण तुपारे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सरदार वल्लभभाई पटेल : भारताचे पोलादी पुरुष