वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
युगान्त : श्रीकृष्णाच्या रुढ चरित्रास छेद देणारे लेखन
कृष्णाने असामान्य कृत्यांनी इतरांना राज्ये मिळवून दिली. कृष्ण कधी रडला नाही, तो शस्त्र हाती न घेता युद्धात लढला. त्यामुळेच तो कृष्ण आपल्या कवेत येत नाही. युगान्त या शेवटच्या प्रकरणात युगाबद्दल चर्चा आहे. कोणते युग कोठून मोजायचे हा एक महाप्रश्न आहे. हे अंदाजपंचे दाहोदर्शे आहे असे लेखिकेस वाटते. कृष्णाचे देवपण गृहीत धरले आहे. तो देव नव्हता. तत्कालीन सामाजिक स्थिती, लोकपरंपरा, रितीरिवाज, नितीनियम यांचे अवलोकन केले आहे.
पुस्तकाचे नाव 'युगान्त' असल्याने मुखपृष्ठ गडद काळ्या रंगाचे आहे. एक युग संपताना काळा काळोख दाटतो; मग नव्या युगाचा प्रकाश फाकतो असे सुचवायचे असावे. ही या पुस्तकाची चौवीसवी आवृत्ती आहे, यावरून पुस्तकाची लोकप्रियता लक्षात घ्यावी. मी १९८० साली दहावीस असताना इरावर्ती कर्वेंचा महर्षी धोंडो कर्वे यांच्यावरचा लेख मराठी विषयासाठी अभ्यासक्रमात होता. तेव्हापासून लेखिकेचे हे नाव ध्यानात आहे. महाभारत या ग्रंथावर या पुस्तकात एकुण दहा लेख आहेत. त्यातून महाभारतातील पात्रे, व्यक्तीमत्वे, त्यांचे स्वरूप व स्वभाव, घटना, विचार, उद्गार, समाजावर पडलेला प्रभाव याचा परखडपणे लेखाजोखा घेतलेला आहे. दहा प्रकरणात भीष्म, गांधारी, कुंती, विदुर, द्रौपदी, खांडवप्रस्थ, द्रोण/अश्वत्थामा, कर्ण, कृष्ण, युगांत- सारांश असा परामर्श घेतलेला आहे. तो घेताना वर्णनाच्या अनुषंगानेच स्पष्ट मते, वागणुकीच्या अनुषंगानेच निर्णय क्षमता, समस्यांच्या अनुषंगानेच तत्कालीन स्थिती, घडामोडींच्या अनुषंगानेच निष्कर्ष विशद केला आहे. यातूनच लेखिकेची उच्च निरिक्षण क्षमता, चुकीचे पडदे फाडणारे तर्क, घटनांवरून ठाम मतांची मांडणी, भूतकाळाचे अचंबित करणारे वेध लक्षवेधी झालेले आहेत. आपणा सर्वांना महाभारत कथा माहीत आहेत; परंतु या महत्वपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून आपण नव्याने महाभारतास सामोरे जातो. नव्या गोष्टी, निरिक्षणे, रंग, आकार आपल्या आकलनात येतात.
शेवटचा प्रयत्न या पहिल्या प्रकरणात भीष्म पितामह यांचे गुण दोष, अठरा दिवसाचे युध्द, सर्व प्रमुख पात्रांचे वय, युध्द थांबविण्याचे अखेरचे प्रयत्न आणि शेवटी युध्दाची परिनिती सांगितली आहे. गांधारी- या प्रकरणात गांधारीचे धृतराष्ट्राशी फसवणूक करून केलेले लग्न, डोळ्यांवर पट्टी बांधण्याची सूड बुध्दी, पुत्रांचे अमाप पिक, शेवटी झालेला निर्वंश विषद केला आहे. कुंती या तिस-या प्रकरणात कुंतीचे चरित्र, मग पंडूशी झालेलं लग्न, तिचे हस्तिनापुरात अस्तित्व, पाच पुत्रांना एकत्र ठेवण्याची कसरत, कर्णाला जवळ घेण्याचा असफल प्रयत्न वाचण्यासारखा आहे. विदुर या चौथ्या प्रकरणात, विदुर दासीपुत्र कसा झाला. ज्ञानी असून राजा होवू शकला नाही. त्याने पांडवांच्या जिवीताची घेतलेली काळजी स्पष्टपणे मांडली आहे.
द्रौपदी या पाचव्या प्रकरणात तिचे सर्व गुण दोष, तिचा स्वाभिमान, संकटातील कसोटी आपण वाचतो. द्रौपदीच्या नातेसंबंधामुळेच पांडवांना शक्ती प्राप्त झाली. द्रौपदीने पांडवांना सर्वनाशापासून वाचविले. खांडवप्रस्थ या प्रकरणात एका रानटी प्रदेशाचे कसे एका सुंदर राजधानीत केलेले रूपांतर, इंद्रप्रस्थचे वर्णन, मयसभेत कौरवांची झालेली फजिती, अपमान यात आहे. महाभारतात खांडवप्रस्थ हे सुध्दा एक प्रमुख पात्र आहे. द्रोण/ अश्वत्थामा- या सातव्या प्रकरणात द्रोण गुरू आणि पिता म्हणून बजावलेली भूमिका, त्याने द्रुपदवर घेतलेला सूड, युध्दातील त्याचे कर्तव्य आले आहे. तसेच त्याचा पुत्र अश्वत्थामा ह्याने रात्रीच्या अंधारात पांडवपुत्र यांचा वध, त्यास मिळालेला शाप आला आहे.
कर्ण हा सुतपुत्र गणला गेला होता तरी त्याकडे अद्भूत कवचकुंडले आणि चिलखत असल्याने आपण कोण तरी खास आहोत हे त्यास आतून जाणवत होते. तो दंद्व मनःस्थितीत असतो. शेवटी कुंती त्यास स्वतः सांगते की तो पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहे, या वृत्तामुळे तो अधिक गोंधळात पडतो. युध्दात शेवटी तो सेनापती म्हणून लढतो; पण मारला जातो. भावनांचा गुंता आणि कर्तव्याचे चक्रव्यूह यांची सरमिसळ वाचावयास मिळते. कृष्ण या नवव्या प्रकरणात पारंपरिक कृष्ण चरित्रास छेद देवून तो एक योध्दा होता; पण त्रिकालज्ञानी किंवा सर्वज्ञ नव्हता हे उदाहरणासह पटवून दिले आहे. द्वारका वसविण्याचा निर्णय, जरासंधाशी थेट युद्ध न करता कपटनितीने केलेला वध आपणास पटतो. सुदामा कृष्णाची मैत्री कथा खोटी असल्याचे लेखिका म्हणते. कृष्णाने असामान्य कृत्यांनी इतरांना राज्ये मिळवून दिली. कृष्ण कधी रडला नाही, तो शस्त्र हाती न घेता युद्धात लढला. त्यामुळेच तो कृष्ण आपल्या कवेत येत नाही. युगान्त या शेवटच्या प्रकरणात युगाबद्दल चर्चा आहे. कोणते युग कोठून मोजायचे हा एक महाप्रश्न आहे. हे अंदाजपंचे दाहोदर्शे आहे असे लेखिकेस वाटते. कृष्णाचे देवपण गृहीत धरले आहे. तो देव नव्हता. तत्कालीन सामाजिक स्थिती, लोकपरंपरा, रितीरिवाज, नितीनियम यांचे अवलोकन केले आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपणास नवी दिशा मिळाल्याचा आनंद मिळतो. हे या पुस्तकाचे यश आहे. हे मोठे पुस्तक असल्याने खरा वाचकच तो पूर्ण वाचू शकतो, पुस्तक वाचनीय आहे.
युगान्त - लेखिका :  इरावती कर्वे  प्रकाशक - देशमुख आणि कंपनी  
आवृत्ती २४ वी   मुखपृष्ठ/मांडणी/अक्षररचना - सुरेश माने  
पृष्ठे - २४४, मूल्य ३५०/- रु.
-गज आनन म्हात्रे