वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘गजलक्ष्मी' : मातीत दडलेल्या समृद्धीची साक्षी
काही गोष्टी रोज आपल्या नजरेसमोर असतात, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्या वस्तू, त्या शिळा, त्या अवशेष, ज्यांच्याकडे नीट पाहिलं तर काळाचा ठसा दिसतो, पण आपण व्यस्त जीवनात त्यांच्याशी ओळख करून घेतच नाही. नवी मुंबई लगतच्या उरण तालुक्यातील पिरकोन हे छोटेसे गाव त्याचेच एक उदाहरण आहे. गावाभोवती असलेल्या शेतजमिनी, डोंगर आणि मंदिरे यांच्या कुशीत एक असा ठेवा लपला आहे, जो आपल्या संस्कृतीच्या वैभवाचा साक्षीदार आहे, ‘गजलक्ष्मी' शिल्पांचा ठेवा!
विविध शिल्पांच्या शोधात असताना संशोधकांनी पिरकोनच्या शिवमंदिराजवळ काही वेगळ्या आकृत्या पाहिल्या. या आकृत्यांचे स्वरूप वीरगळांसारखे नव्हते. मांडी दुमडून बसलेली आकृती, तिच्या दोन्ही बाजूंनी कोरलेले सुंदर हत्ती, आणि संपूर्ण रचनेतील शांततेचा भाव, या सगळ्यात एक दिव्यता दडलेली जाणवली. सुरुवातीला ती मूर्ती चतुर्भुज देवीची असावी असा अंदाज होता, पण हे शिल्प हाती पुष्प धारण केलेल्या द्वीभूज लक्ष्मीची असावी.
अभ्यास पुढे सरकत गेला आणि पुण्यातील एका शिल्पाशी याची तुलना झाली. चर्चेतून एक निष्कर्ष ठाम झाला. ही मूर्ती म्हणजेच ‘गजलक्ष्मी'. धन, धान्य, समृद्धी आणि शुभत्वाचं प्रतीक असलेली ही देवी अनेक ठिकाणी द्वारशिल्पाच्या स्वरूपात दिसते. जुन्या मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर, किल्ल्यांच्या गाभाऱ्यात, किंवा स्तंभांवर गजलक्ष्मीचे शिल्प असायचे. कारण ती म्हणजे घरात किंवा गडात समृद्धीच्या प्रवेशाची खूण!
गजलक्ष्मीचं वर्णन खूप सुंदर आहे. पद्मासनात बसलेली लक्ष्मी, हातात धान्याची कणसे अथवा पुष्प, दोन्ही बाजूंनी जलकुंभातून वर्षाव करणारे हत्ती. हत्तींच्या त्या प्रवाहात केवळ पाणी नसतं; तो म्हणजे जीवनदायी ऊर्जेचा वर्षाव. काही अभ्यासक सांगतात की, लक्ष्मी ही पृथ्वीचं प्रतीक आहे, आणि हत्ती म्हणजे मेघ. मेघ पृथ्वीवर पाऊस पाडतात तसेच हत्ती लक्ष्मीवर जलवर्षाव करतात; अन्नधान्यसंपन्न पृथ्वीचा हा प्रतीकात्मक अर्थ!
जुन्नर तालुक्यात बोरी-शिरोली, नाणेघाट, निमगिरी, घंगाळधरे अशा सहा ठिकाणी अशी शिल्पे आढळतात. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही त्यांची उपस्थिती आहे. नवी मुंबई जवळील या पिरकोन गावात अशा दोन गजलक्ष्मी शिल्पांचा शोध लागला आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. कारण याचा अर्थ असा की, या परिसरातही प्राचीन काळी शिल्पकला, धर्म आणि संपन्न संस्कृती फुलली होती.
पुराणात ‘गजलक्ष्मी चा उल्लेख शक्तिदेवतांमध्ये येतो. महाकाली, दुर्गा, अंबिका, महागौरी, भुवनेश्वरी या देवींसोबत तिचा उल्लेख होतो. ती केवळ धनाची नव्हे, तर सृजनशक्तीची देवी आहे. तिच्या शिल्पाकडे पाहताना असं वाटतं की, दगड जरी निश्चल असला तरी त्या आत कुठेतरी ओघळत्या जलासारखी जीवनशक्ती प्रवाहित आहे.
परंतु दुर्दैवाने, हा अनमोल ठेवा आज दुर्लाक्षित आहे. मंदिराच्या मागे शेतजमिनीच्या कडेला असलेली ही शिल्पे गवताखाली, मातीच्या थराखाली झाकली गेली आहेत. काही अवशेष तर मंदिर बांधताना जमिनीत गाडले गेले असावेत. काळाने थोडीशी दिशा बदलली की, आणखी कितीतरी अशा अज्ञात गोष्टी समोर येतील, याची खात्री वाटते.
पण त्यासाठी एक गोष्ट हवी... शोधक दृष्टी.
इतिहास केवळ पुस्तकात नसतो; तो आपल्या गावात, आपल्या दगडात, आपल्या मातीत जिवंत असतो. आपण तो पाहिला नाही, जाणला नाही, तर तो हरवून जातो. पिरकोनची ही गजलक्ष्मी आपल्याला तेच सांगते "मला पाहा, माझ्यात तुमच्या समृद्ध परंपरेचा श्वास आहे.”
म्हणून या शिल्पांकडे केवळ दगड म्हणून पाहू नका. ते आहेत आपल्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक. आज या दुर्लाक्षित गजलक्ष्मीला पुन्हा सन्मान मिळायला हवा. अभ्यासकांनी, ग्रामस्थांनी आणि प्रशासनानेही तिची दखल घ्यायला हवी.
या परिसरावर, तुमच्या घरांवर गजलक्ष्मीचा वरदहस्त असो.
धान्य, पाऊस, आणि समृद्धी यांची अखंड बरसात होत राहो, हीच त्या शिल्पाकडे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील प्रार्थना! - तुषार म्हात्रे