‘बेलापूर'मधील १८ हजार दुबार, १५ हजार बोगस नावे वगळा

जुईनगर मधे मतदाराच्या नावासमोर राहण्याचा पत्ता ‘सुलभ शौचालय'

नवी मुंबई : साधारण १५ हजार दुबार आणि पत्ता सापडत नसलेली १८,४०३ बोगस नावांची यादी पुन्हा एकदा मनसे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी बेलापूर निवडणूक निर्णय अधिकारी विकास गरुडकर यांना दिली. दरम्यान, एक वर्षापूर्वी सदर यादी दिलेली असताना देखील अजून त्यावर ठोस कारवाई का केली नाही, असा जाब ‘मनसे'ने निवडणूक निर्णय अधिकारी यांना विचारला. त्यावर आतापर्यंत साधारण ४ ते ५ हजार दुबार नावे वगळली असून इतर दुबार नावांवर कार्यवाही चालू असल्याची माहिती विकास गरुडकर यांनी दिली. जी वगळलेली नावे आहेत तसेच नवीन समाविष्ट नावे याची यादी देताना पत्ता आणि कारण याची माहिती देत नाहीत. ती माहिती देण्याची मागणीही ‘मनसे'ने यावेळी केली. मृत दाखला न मिळाल्याने मृत व्यक्तींची नावे वगळली जात नाहीत, त्यासाठी महापालिकेकडून मृत दाखला घेऊन नावे वगळावी, अशी सूचना विकास गरुडकर यांनी तात्काळ मान्य केली.

पत्ता सापडत नसलेली १५ हजार बोगस नावांची छाननी होणे आवश्यक असल्याचे ‘मनसे'ने सांगितले असता या यादीतील मतदारांचा वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरुन योग्य पंचनामा करुन अशी नावे वगळण्याची कार्यवाही करु, असेही निवडणूक अधिकारी गरुडकर यांनी दिली. बेलापूर विधानसभा मधील यादी क्रमांक १४८ मधील अनुक्रमांक ५१ च्या मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय आहे. असा घोळ कोणत्या अधिकाऱ्यांनी केला? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला.

१ नोव्हेंबर पासून बोगस नावे वगळण्याची कामे प्राधान्याने सुरु होत असल्याची माहिती निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी दिली. तर ‘मनसे'चे बुथ लेव्हल पोलिंग एजंट (बीएलए) आणि गटअध्यक्ष जोमाने काम करुन मतदार यादी शुध्दीकरण करतील, असे गजानन काळे यांनी सांगितले.

‘मनसे'च्या या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यासह शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना उपशहरअध्यक्ष अनिथा नायडू, विभागअध्यक्ष अमोल आयवळे, योगेश शेटे, रोजगार सेना शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, उपविभागअध्यक्ष राजेंद्र खाडे, विद्यार्थी सेना उपशहरअध्यक्ष प्रतिक खेडकर, महिला सेना विभागअध्यक्ष शीतल दळवी, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मनसे तर्फे  वाशी स्थानकाबाहेर "सत्याचा मोर्चा"ची पत्रके वाटून मतदारांमध्ये जनजागृती