ऐन दिवाळीत टावरी पाड्यात कचऱ्याचे ढीग
कल्याण : सणासुदीला ऐन दिवाळीत कल्याण पश्चिमेतील टावरी पाडा शंखेश्वर प्रेसिडेन्सी येथे सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचा ढीग साचला आहे. महापालिकेची गाडी येत नसल्यामुळे कचरा जमा झाला आहे. याबाबत येथील नागरिकांनी सातत्याने फोन करुनही महापालिकेची गाडी येत नाही. आठवड्यातून ३ ते ५ दिवसाआड गाडी येते.
या मोठ्या सोसायटीत ६१० पलॅट आहेत. प्रत्येक दिवशी एवढ्या मोठ्या सोसायटीत कचरा उचलण्यासाठी रोज गाडी येणे अपेक्षित आहे; परंतु गाडी ३ ते ५ दिवसाआड येत असते. यामुळे सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीच्या मेन गेटवर असा कचऱ्यांचा खच पडलेला असून संपूर्ण सोसायटीचे विद्रुपीकरण झालेले आहे.
तसेच घाणीचे साम्राज्य पसरलेले असून त्या माध्यमातून असंख्य प्रकारचे आजार पसरायला सुरुवात झालेली आहे. परिसरात येता-जाता दुर्गंधीला सामोरे जावे लागते. महापालिकेला ६०० रुपये स्वच्छतेसाठी कर भरला जातो आणि तरीही सोसायट्यांची अशी दुरवस्था आहे. जर कर भरुनही सुविधा मिळत नसेल तर कर का म्हणून भरला जावा? असा सवाल स्थानिक रहिवासी विनोद शेलकर यांनी उपस्थित केला आहे.