15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारी रोजी 206 शाळांमध्ये सुरूवात

सुरूवातीपासूनच कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे 18 वर्षावरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केले होते व त्यानंतरही दोन्ही डोस लसीकरण झालेली टक्केवारी 87 टक्के इतकी आहे.

      यामध्ये आता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू करावयाचे आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीड विषयक नियमित वेबसंवादाव्दारे घेतल्या जाणा-या दैनंदिन आढावा बैठकीत संबंधितांशी विस्तृत चर्चा करून लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

      महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये 3 ते 10 डिसेंबर या कालावधीत लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिका व खाजगी अशा एकूण 206 शाळांमधील 2007 किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या 72 हजार 823 विद्यार्थ्याचे लसीकरण करण्यात येणार आहे.

      प्रत्येक दिवशी साधारणत: 25 हून अधिक शाळांमध्ये दररोज 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून त्याकरिता नागरी आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये मुलांचे लसीकरण करावयाचे असल्याने नागरी आरोग्य केंद्रातील अनुभवी कर्मचारीवृंद या लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.

      शाळांमध्ये होणा-या या लसीकरणाच्या विशेष सत्रांसाठी आवश्यक जागा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन सर्व शाळा व्यवस्थापनांना करण्यात आले असून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वेळेवरच पालकांसमवेत येऊन विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावयाचे आहे. लसीकरणासाठी येताना नोंदणी प्रक्रिया, ओटीपी अशा महत्वाच्या बाबींसाठी मोबाईल सोबत असणे गरजेचे आहे असेही शाळांमार्फत पालकांना सूचित करण्यात येत आहे.

      लसीकरणाच्या या कार्यवाहीत पालक, विद्यार्थी व शाळांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत व आल्याच तर त्याचे निराकरण त्वरित व्हावे यादृष्टीने महानगरपालिका शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक यांना त्यांच्या विभागातील शाळांच्या लसीकरण प्रक्रियेच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

      शासनाच्या कोविन पोर्टलवरही पालक आपल्या लाभार्थी विद्यार्थ्याच्या नावाची नोंद करून ठेवू शकतात. कोव्हीड लसीकरणाव्दारे नागरिक लवकरात लवकर संरक्षित व्हावेत हा महानगरपालिकेचा प्रयत्न असून त्यादृष्टीने विद्यार्थी, पालकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस दिला जाणार आहे. तरी सर्व पालकांनी शाळांकडून लसीकरणासाठी उपस्थित राहण्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यावेळी मोबाईलसह उपस्थित राहून आपल्या पाल्याचे लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाले असले तरी पाल्यासह स्वत: मास्कचा वापर नियमित करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

 

Read Previous

पनवेलच्या डायलेसिस सेंटरचे पालक मंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते आज उदघाटन

Read Next

सर्वोत्तम कामाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवताना नागरिकांना प्राधान्य हे सूत्र अंगिकारण्याची आयुक्तांची भूमिका