नवी मुंबई पोलीस दलात 527 पदांची भरती प्रक्रिया सुरु

नवी मुंबई  : नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या एकूण 527 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 ठेवण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार असून अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाईची 445 तर पोलीस शिपाई चालकांची 82 पदे भरली जाणार आहेत. नवी मुंबई पोलिस दल हे राज्यातील अत्याधुनिक पोलिस आयुक्तालयांपैकी एक असून, वाढत्या लोकसंख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्या भरतीला विशेष महत्त्व आहे.  

या भरती प्रक्रीयेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष असणे आवश्यक आहे.  
पोलीस शिपाई पदासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षे आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांचे वय 18ते 33 वर्षे असावे. तर पोलीस शिपाई चालक पदासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांचे वय 19 ते 28 वर्षे आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांचे वय 19 ते 33 वर्षे असावे. एससी / एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट आहे, तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱया उमेदवारंची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी  आणि वैद्यकीय तपासणी घेण्यात येणार आहे.  

पोलीस भरतीचे अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी 450 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबर पासून सुरु झाली असून, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील. नवी मुंबई पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी ही भरती प्रक्रीया राबविण्यात आली असून नव्या भरतीनंतर वाहतूक नियंत्रण, गस्त पथके, आणि विशेष युनिट्सना अधिक मनुष्यबळ मिळणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे.  

संजयकुमार पाटील (पोलीस उपआयुक्त मुख्यालय)
नवी मुंबई पोलीस दलात देखील पोलीस शिपाईची 445 तर पोलीस शिपाई चालकांची 82 पदे भरली जाणार आहेत. भरती प्रक्रियेचे तपशील, पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित अधिकृत पोर्टलवरील अधिसूचनेत देण्यात आली आहे. अर्जदारांना दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील.  

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश