तुर्भे विभाग कार्यालयावर ‘मनसे'चा बोंबा मारा मोर्चा

नवी मुंबई : तुर्भे, सानपाडा, जुईनगर, वाशी विभागातील विभागातील विविध नागरी समस्यांसंदर्भात ‘मनसे'ने राज्य प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली १६ ऑक्टोबर रोजी तुर्भे विभाग कार्यालयावर ‘बोंबा मारा मोर्चा' काढण्यात आला.

सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेज पासून ‘मनसे'च्या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. या मोर्चात विभागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण-महिला, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

तुर्भे, सानपाडा, जुईनगर, वाशी विभागातील विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने कानाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी मोठा संताप निर्माण झाला आहे. याबाबत ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांना चांगलेच धारेवर धरले. पुढील १५ दिवसांत नागरी समस्या सोडविल्या नाहीत तर महापालिका विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा गजानन काळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी ‘मनसे'च्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह शहर सचिव विलास घोणे, शहर सहसचिव अभिजीत देसाई, दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, चंद्रकांत मंजुळकर, विकास पाटील, अक्षय भोसले, महिला उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, महिला उपशहर अध्यक्षा दिपाली ढऊळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सानपाडा, सेक्टर-७ येथील कै. सीताराम मास्तर उद्यान सकाळी ११ वाजता बंद करण्यात येते. सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बंद होण्याची वेळ वाढवून ती दुपारी १२.३० वाजेपर्यंत करण्यात यावी. सानपाडा विभागातील रस्ते तसेच पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. त्यामुळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई करून येथील रस्ते-पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्यात यावेत. सानपाडा विभागात बऱ्याच ठिकाणी पडलेले रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर तातडीने कायमस्वरुपी कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा कायदा हातात घेऊ, असा इशारा यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला.

सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू आहे. बाहेरुन येणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे घरफोडी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, नागरिकांना लुटणे, आदि गुन्हेगारीच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे य्परप्रांतीय फेरीवाल्यांवर ताबडतोब कायमस्वरुपी कारवाई करण्यात यावी. बऱ्याच ठिकाणी पदपथाची दुरवस्था झालेली असून गटारांची झाकणे गायब झालीत. यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

जुईनगर, सेक्टर-२३ मधील रहिवाशांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही आहे. जुईनगर गावठाण परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तुर्भे जनता मार्केट येथे राजरोसपणे रस्त्यावर सुरु असलेला वेश्याव्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. तुर्भे स्टोअर येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. कोपरी गावात नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्यात यावे. पाण्याच्या वेळेमध्ये अनियमितता असल्याने नागरिकांना पाण्याचा योग्य वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा. ‘एमआयडीसी'मधून रात्री सोडणाऱ्या धुरामुळे होणारे वायू प्रदूषण वाढले आहे, आदि मागणी यावेळी महापालिकाकडे करण्यात आल्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माजी महापौरांचे नाव २ विधानसभा मतदारसंघात