वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
डोंबिवलीत अचानक महापालिका आयुक्तांचा पाहणी दौरा
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली शहरात १६ ऑवटोबर रोजी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक पाहणी दौरा केला. शून्य कचरा मोहिमेअंतर्गत कचरामुक्त शहर, ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण याकरिता सदर दौरा होता. विशेष म्हणजे डोंबिवलीत पुन्हा माणुसकीची भिंत सुरु आहे.
महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यात घनकचरा उपायुक्त कोकरे, फ-प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त हेमा मुंबरकर आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक ठिकाणी पाहणी केल्यावर काही भागात कचरा पडलेला असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. कचरामुक्त डोंबिवली शहर करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
ओला-सुका कचरा वर्गीकरणाला २०२० पासून सुरुवात झाली आहे. मात्र, कोकरे यांची बदली झाल्यानंतर ओला-सुका कचरा वर्गीकरण कमी झाले. आता पुन्हा कोकरे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्तपदी आल्यावर घनकचरा विभाग पूर्वीप्रमाणे जोरदार कामाला लागले आहे.
शून्य कचरा मोहिमेअंतर्गत कचरामुक्त कल्याण-डोंबिवली शहर करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ओला-सुका कचरा वर्गीकरण १०० टक्के करण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त कोकरे यांनी केले आहे.
दरम्यान, काही वर्षापूर्वी डोंबिवलीतील महापालिका कार्यालयात ‘माणुसकी भिंत' उपक्रम सुरु करण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत आपल्याला जुने कपडे, बूट, चपला, वह्या, पुस्तके दिले होते. मात्र, काही दिवसांनी महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे या उपक्रमाने वेग धरला नाही. उपायुक्त कोकरे यांनी ‘माणुसकी भिंत' उपक्रम पुन्हा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.