धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव १५ ऑगस्ट पासून कार्यान्वित?

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून बाळकुम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे येत्या १० ऑगस्ट २०२४ पर्यत पूर्ण करावीत. तसेच तरणतलाव १५ ऑगस्टपर्यत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

२ जुलै रोजी आयुक्त सौरभ राव यांनी बाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम आणि कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मिनल पालांडे, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर, आदि उपस्थित होते.

बाळकुम, कोलशेत आदि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. सदर तरणतलाव अद्याप नागरिकांसाठी खुला झाला नसल्याने तो लवकर खुला करण्याची मागणी सातत्याने परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी या तरणतलावाची पाहणी करुन कामाचा आढावा घेतला. तसेच सदर ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,  असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तळमजला अधिक चार मजल्याची सदर इमारत असून इमारतीच्या लिपटचे काम सप्टेंबरपर्यत पूर्ण होईल, असे संबंधित ठेकेदाराकडून सांगण्यात आले. परंतु, तत्पूर्वी तरणतलावाची सर्व कामे पूर्ण करुन सदर तरणतलाव १५ ऑगस्ट रोजी नागरिकांसाठी खुला करावा, असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच सदर ठिकाणी लहान मुलांसाठी बेबी पुलची मागणीही नागरिकांकडून होत असल्याचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आवश्यक बदल करुन मार्ग काढण्यात येईल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियमची देखील आयुवतांनी पाहणी केली. या स्टेडियमध्ये असलेल्या बॅडमिंटन कोर्टच्या छताचे वॉटरप्रुफींगचे काम तातडीने करण्यात यावे, तसेच इमारतीला लावण्यात आलेल्या टाईल्स उखडलेल्या असून त्याची दुरुस्ती करावी. तसेच ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या. घोडबंदर परिसरातील कलरकेम येथे महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडाची पाहणीही यावेळी करण्यात आली. घोडबंदर परिसरात नागरिकांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नसून सदर सुविधा भूखंडावर क्रिकेटचे मैदान तयार केल्यास याचा फायदा परिसरातील मुलांना निश्चितच होईल, असे माजी नगरसेविका उषा भोईर म्हणाल्या. तसेच बाळकूम येथे असलेल्या कलाभवनची पाहणी आपण केली असून कलाभवन दुरुस्ती करुन ते लवकरच कलाप्रेमींसाठी खुले होईल, या दृष्टीने कार्यवाही करणार असल्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिक्षण क्षेत्रातील लूट उघडकीस आणण्यासाठी प्रत्यक्ष ट्रम्प तात्या रस्त्यावर