पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यालयात करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, पनवेल शहरातील कुंभारवाड्यातील मुर्तीकार, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद बोडके, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणाचे भान राखून गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मागील वर्षी प्रमाणे यावर्षी पनवेल महापालिका अभिनव उपक्रम राबविणार आहे. त्याअनुषंगाने पनवेल शहरातील कुंभारवाड्यातील मुर्तीकारांना शाडू पासून गणेशमुर्ती तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कुंभारवाड्यातील मुर्तीकारांनी शाडू पासून मुर्त्या करण्यासाठी महापालिकेच्या वतीने त्यांना शाडूची माती पुरविली जाणार आहे. यादृष्टीने त्यांची मातीची मागणी लिहून घेण्यात आली. मागणीनुसार माती मुर्तीकारांना घरपोच करण्यात येईल. तसेच शाडू पासून बनविलेल्या मुर्त्या विक्री करण्यासाठी मोठ्या सोसायट्यांमध्ये जागा उपलब्ध करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

शाळेतील विद्यार्थी भावी नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये पर्यावरणाचे भान जागृत करण्याच्या दृष्टीने महापालिका तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देखील सामील करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडू पासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कला शिक्षिकांना मुर्ती प्रशिक्षण देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर मध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या हालचालींना वेग