‘जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा'ला प्रारंभ

नवी मुंबई : क्रीडा-युवक सेवा संचालनालय-महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद-ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा २०२४-२५'चा शुभारंभ २७ जून रोजी महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ‘महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन'चे उपाध्यक्ष तथा नमुंमपा क्रीडा नियोजन समिती सदस्य धनंजय वनमाळी, आदि उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका खेळाला प्राधान्य देत असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ९४ संघ आणि १५०० हुन अधिक खेळाडू सहभागी होत असल्याचे सांगत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

विविध खेळांच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिका कटीबध्द असून महापालिका क्षेत्रातून गुणवंत खेळाडू घडावेत, असा उद्देश आहे. या सर्व स्पर्धांतून आपली गुणवत्ता सिध्द करणारे खेळाडू घडतील आणि राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व गाजवतील, असा विश्वास आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.

शालेय जीवनात अभ्यासाप्रमाणेच अंगभूत कौशल्य विकसीत होत असून पुढील जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. सदर बाब लक्षात घेत प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या आवडीचा खेळ पूर्ण क्षमतेने खेळला पाहिजे, असे आयुक्त डॉ. शिंदे म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेला शालेय क्रीडा आयोजनासाठी जिल्ह्याचा दर्जा लाभलेला आहे. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत विविध स्तरांवर जिंकत जाणारा शाळेचा फुटबॉल संघ थेट राष्ट्रीय स्तरावरही खेळू शकतो, उपायुवत अभिलाषा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, २७ जून ते ९ जुलै या कालावधीत नेरुळ, सेवटर-१९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर सदर जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा संपन्न होत असून यामध्ये १५ वर्षाआतील मुलांचे ३६ शालेय संघ तसेच १७ वर्षाआतील मुलांचे ३६ आणि मुलींचे २२ संघ सहभागी झाले आहेत. 

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी