कविता डॉट काँमचा द्वितीय वर्धापन दिन वाशीमध्ये साजरा

नवी मुंबई : वाशी येथील साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या साहित्य मंदिर सभागृहात ३० जून रोजी कविता डॉट कॉम या साहित्य चळवळीचा द्वितीय वर्धापन दिन रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने व चांगल्या प्रतिसादाने साजरा करण्यात आला.

संमेलनाध्यक्ष अरूण म्हात्रे यांनी विविध कवींच्या तसेच स्वतःच्याही निवडक कवितांचे सादरीकरण करीत विविध आठवणी व किस्से सांगत आपले भाषण रसिकांसमोर ठेवले. नवी मुंबईची एकूण लोकसंख्या व त्यातील मराठी टवका लक्षात घेता या व येथे पार पडणाऱ्या विविध साहित्यिक कार्यक्रमांना अधिक गर्दी व्हायला हवी अशी अपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अरूण म्हात्रे यांच्या लेखणीतून साकारलेले झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका' या मालिकेचे शीर्षक गीत ‘सुरज डान्स अकॅडमी' यांनी सुंदरपणे सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे यांच्या हस्ते तुळसी वृंदावनास पाणी घालून उद्‌घाटन संपन्न झाले. वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेल्या पालखीनंतर त्यातील ग्रंथ पूर्व संमेलनाध्यक्ष अशोक बागवे यांनी या वर्षीचे संमेलनाध्यक्ष अरूण म्हात्रे यांच्याकडे देत अध्यक्ष पदाचे सुत्र सुपुर्द केले. स्वागताध्यक्ष शिवव्याख्याते प्राचार्य रविंद्र पाटील यांनी कविता डाँट काँमचा दोन वर्षांचा प्रवास मांडताना आगामी काळातील नियोजन सर्वांपुढे ठेवत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उद्‌घाटक साहेबराव ठाणगे, सुभाष कुलकर्णी यांनी कविता डाँट काँम परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र औटी यांना जीवनगौरव पुरस्कार वितरीत करण्यात आला.पूर्व संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक बागवे यांनी कवितेचे मानवी जीवनातील महत्व विषद करत कविता डाँट कामच्या कामाचे कौतुक करत आपल्या शैलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सत्रात ठेवण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात कवी सतीश सोळांकुरकर, प्रथमेश पाठक, संदीप राऊत, विजय उतेकर, रत्नमाला शिंदे, यामिनी दळवी यांच्या बहारदार कवितेसोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांच्या निवेदनाने रंगत कार्यक्रमात रंगत आणली.

तिसऱ्या सत्रात लोककवी प्रशांत मोरे यांनी कवितेवर भाष्य करत आपल्या सुरेल आवाजात विविध कविता सादर करत मैफिल गाजवली. या  कार्यक्रमाचे निवेदन नारायण लांडगे पाटील यांनी आपल्या मिश्कील शैलीत करत कार्यक्रमात रंगत आणली. दिलीप जांभळे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसाद माळी आणि दिक्षिता लाड यांनी पसायदान घेत कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र लाड , वैभव वर्हाडी, शंकर गोपाळे, रूद्राक्ष पातारे, अनिल उबाळे, अनिल सकपाळ , विलास समेळ यांनी विशेष मेहनत घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अक्कादेवी धरण ओव्हरफ्लो