नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची रखडली प्रवेश प्रक्रिया

नवी मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांची मंजुरी मिळूनही केवळ तपासणी न झाल्याने नवी मुंबई महापालिकेच्या स्वमालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ‘ठाणे'चे खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्ली येथे आरोग्य-कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेत तातडीने ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग'ने महाविद्यालयाची पाहणी करुन महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ मधील नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पी.जी.आय.एम.एस.) या नावाने स्वमालकीच्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन यांचे विविध विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे. वैद्यकशास्त्र, बालरोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सक, अस्थिव्यंग या ५ विषयांसाठी ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग'कडे मंजुरीसाठी नवी मुंबई महापालिकेने अर्ज सादर केला असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली.

‘नमुंमपा'ने विहीत शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग'कडे सादर केलेली आहेत. मात्र, ‘आयोगे'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज सादर केल्यानंतर विहीत नियमावलीप्रमाणे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केल्यानंतर पुढील मंजुरीची कार्यवाही होते. २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात तपासणी न झाल्याने या वर्षीची प्रवेश प्रक्रिया झालेली नाही. परिणामी, नवी मुंबई महापालिकेचा अर्ज २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षात ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे ‘आयोग'ने महापालिकेला कळविले असल्याचे खासदार म्हस्के यांनी ना. प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणले.

संपूर्ण हिंदुस्थानातील पदव्युत्तर महाविद्यालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने नवी मुंबई मधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना २०२५-२६ या वर्षांसाठी प्रवेश परीक्षांबाबत कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. या महाविद्यालयामुळे लक्षावधी गोरगरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे. नवी मुंबई, रायगड, अलिबाग, पेण, खोपोली या मोठ्या कार्यक्षेत्रात सध्या एकही सर्वसामान्य रुग्णांसाठी रुग्णालय नसल्याने ते उपलब्ध होण्यासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विभागाचे मंत्री म्हणून ना. प्रतापराव जाधव यांना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची विनंती केली आहे. - नरेश म्हस्के, खासदार-ठाणे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 अंबरनाथ मध्ये पाणीटंचाई; ‘काँग्रेस'चा मोर्चा