पर्यावरपुरक उत्सवासाठी मुर्तीकारांना पूर्ण सहकार्य
अतिरिक्त आयुक्त माळवी, रोडे यांचा मुर्तीकारांशी संवाद
ठाणे : पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे समाज म्हणून आपली सर्वांची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे आजवरप्रमाणेच मुर्तीकारांनी महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी मुर्तीकारांना आवश्यक असलेली जागा, शाडुची माती यांची उपलब्धता महापालिका कडून करण्यात येईल, अशी ग्वाही ठाणे महापालिकेच्या वतीने मुर्तीकारांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आली.
पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्याअनुषंगाने मुर्तीकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने १६ जानेवारी रोजी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तीकार संघटना, गणेशोत्सव समन्वय समिती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी संवाद साधला. यावेळी उपायुक्त (पर्यावरण विभाग) डॉ. पद्मश्री बैनाडे, उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, विधि अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती शाडुच्याच असाव्यात, असे आता स्पष्ट निर्देश आहेत. त्यासंदर्भात मुर्तीकारांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. म्हणून जानेवारी महिन्यातच यासंदर्भात चर्चा घडवून आणल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. सर्वांच्या आरोग्याचा, प्रदुषणाचा विषय असल्याने त्यातून मार्ग कसा काढायचा? सामंजस्याने त्यावर काय तोडगा काढता येईल? यासाठी बैठक घेतल्याचे माळवी यांनी सांगितले.
मूर्ती बनविण्यासाठी जागा, शाडुची माती, विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिका मार्फत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. २००५ पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करुन सर्वांसाठी ठाणे शहराने आदर्श घालून दिला आहे. त्याच धर्तीवर ‘पीओपी'च्या ऐवजी शाडुच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मुर्तीकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल, असे अतिरिवत आयुवत संदीप माळवी यांनी सांगितले.
तर मुर्तींचे विसर्जन व्यवस्थित व्हावे. त्यात त्यांना काही इजा पोहोचू नये, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. सदरचा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा आहे. त्याचा आपण मान राखायला हाव. मुर्तीकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळेच उत्सवाच्या खूप आधीच, जानेवारी महिन्यात बैठक घेत असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मुर्तींपैकी ३० टक्के मूर्ती या शाडुच्या मातीपासून बनवलेल्या होत्या. महापालिकेने पर्यावरणपुरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच शाडुची माती आणि जागाही उपलब्ध करुन दिली होती. त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
सदर बैठकीत जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी कायद्याची लढाई सुरुच राहील; पण आपण सर्वांनी समंजसपणे वागून पुढील पिढ्यांचा विचार करुन निर्णय घ्यायला पाहिजे. ठाणे खाडी क्षेत्र रामसार क्षेत्र जाहीर झाले असल्याने आपली जबाबदारी वाढली आहे, असे मत मांडले.
‘मूर्तीकार संघटना'तर्फे विजय बोळींजकर यांनी हळूहळू शाडुच्या मूर्तींचा प्रसार होत राहील, असे सांगितले. तसेच याविषयी न्यायालयात मूर्तीकारांची बाजू मांडत असल्याचीही माहिती दिली.
‘ठाणे गणेशोत्सव समन्वय समिती'चे अध्यक्ष समीर सावंत, तसेच शुभम चिखले, मंगेश पंडीत, साक्षी गांधी, नागोठणेकर यांनी मुर्तीकारांसमोर असलेले प्रश्न या बैठकीत मांडले. बाहेरुन येणाऱ्या मूर्ती, उत्सवापूर्वी सर्वत्र लागणारे मूर्ती विक्रीचे स्टॉल्स, भाविकांची पसंती आदि मुद्दे त्यांनी उपस्थित केले. शाडुच्या मूर्ती बनविण्यास लागणारा वेळ, त्याची घ्यावी लागणारी काळजी आदि विषय उपस्थित केले. तसेच शाडुच्या मूर्तींची उपलब्धता, त्यात होत असलेले प्रयोग, मूर्तींसाठी भाविकांकडून स्वीकारले जाणारे इतर पर्याय यांचीही सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.
महापालिकेने मूर्ती विक्रीसाठी परवाना घेणे बंधनकारक करावे. मूर्ती विक्रीचा किती वर्षांचा व्यवसाय आहे हेही पहावे, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. मॉलमध्ये विक्रीसाठी काऊंटर, विक्रीच्या स्थानांची प्रसिध्दी करण्यात येईल, असे या बैठकीत महापालिका तर्फे सांगण्यात आले.