ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावू नयेत; अन्यथा आंदोलन
नवी मुंबईः ‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ'मार्फत स्मार्ट- प्रिपेड मीटर बसवण्याचे काम सीवुडस् परिसरामध्ये सुरु करण्यात आले आहे. या कामाला नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावू नयेत अशी मागणी करणारे निवेदन ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या शिष्टमंडळाने ‘महावितरण'चे नेरुळ विभागीय कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. दरम्यान, नागरिकांचा विरोध झुगारुन स्मार्ट मीटर लावण्याची जबरदस्ती झाल्यास ‘शिवसेना'च्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘शिवसेना'चे उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू यांच्या नेतृत्वाखाली सदर शिष्टमंडळात उपशहरप्रमुख समीर बागवान, विभागप्रमुख मिलिंद भोईर, विशाल विचारे, उपविभागप्रमुख निलेश घाग, शाखाप्रमुख स्वप्निल यादव, उपशाखाप्रमुख दत्तात्रय साबळे, ‘युवा सेना'चे प्रतीक कवडे, आदिंचा सहभाग होता.
‘महावितरण'च्या नेरुळ विभाग कार्यक्षेत्रामधील करावे गांव परिसरामध्ये प्रिपेड स्मार्ट मीटर्स लावण्यात येत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी सातत्याने येऊ लागल्या आहेत. या संदर्भात महावितरण कार्यालयात माहिती घेतली असता संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांना त्याची काही माहिती नसल्याचे जाणवते. मात्र, करावे गांव आणि आसपासच्या परिसरामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांचे जुने मीटर परस्पर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटर लावण्यास नागरिकांचा प्रचंड विरोध आहे, असे ‘शिवसेना'तर्फे ‘महावितरण'ला दिलेल्या निवेदनात नमू्द करण्यात आले आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जामंत्री म्हणून सभागृहात ३ जुलै २०२४ रोजी ग्वाही दिली होती की, सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत. शहरात रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना प्रीपेड मीटर परवडणे शक्य नाही. सध्याच्या व्यवस्थेनुसार देयक देण्यासाठी ८ ते १० दिवस मुदत मिळते, ती व्यवस्था प्रीपेड मीटरमध्ये मिळणार नाही. रिचार्ज संपल्यास आपोआप वीज पुरवठा खंडीत होईल. रिचार्ज करायला पैसे नसणाऱ्यांना वीज पुरवठा होऊ शकणार नाही. त्यातून भविष्यात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा सर्व शक्यतांमुळे जरी वीज चोरी रोखण्याच्या उद्देशाने ‘महावितरण'ने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असला तरी रोगापेक्षा इलाज जालीम असा प्रकार असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकाची झाली आहे. नागरिक ‘महावितरण'च्या या कृतीला विरोध करीत असतानाही आमच्या परिसरामध्ये खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावले जात आहेत. सदरची मनमानी आम्हाला मान्य नाही, असे ‘शिवसेना'तर्फे ‘महावितरण'ला सूचित करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नयेत. या विषयावर संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलनाचा पर्याय आम्हाला सुध्दा निवडावा लागेल याची शासनाने नोंद घ्यावी.
-सुमित्र कडू (उपजिल्हाप्रमुख), समीर बागवान (उपशहरप्रमुख), शिवसेना.