बदलापुरात रिक्षा प्रवास महागला
बदलापूरः बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवास महागला आहे. पूर्वीचे प्रतिप्रवासी १५ रुपये असलेले भाडे ५ रुपयांनी वाढवून २० रुपये प्रति प्रवासी करण्यात आले आहे. सरसकट ३.५ कि.मी. पर्यंतच्या प्रवासासाठी सदर भाडेवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, रिक्षा भाडेवाढ रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून केली आत आहे.
बदलापूर पूर्व भागात स्टेशन ते कात्रप, शिरगाव, खरवई आदी भागात जाण्यासाठी प्रति प्रवासी १५ रुपये भाडे आकारले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रवासी भाड्यात ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या सीएनजी दरात कोणतीही मोठी दरवाढ झालेली नाही किंवा ‘आरटीओ'कडून नवे दरपत्रक काढण्यात आलेले नाही. असे असताना अचानक दरवाढ का? असा प्रश्न प्रवासी करीत आहेत. त्यामुळे सदरची दरवाढ रद्द करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
याबाबत, २ महिन्यांपूर्वी रिक्षा प्रवासी भाडे २० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियमानुसार रिक्षात तीन प्रवशांचीच वाहतूक केली जात असल्याची माहिती बदलापूर पूर्वेकडील ‘रिक्षा चालक मालक संघटना'चे अध्यक्ष किशोर देशमुख यांनी दिली.
‘आरटीओ'च्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह...
रिक्षा प्रवासी दरवाढ आणि रिक्षा स्टँड आदींचे नियोजन प्रार्देशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून केले जाते. परंतु, बदलापुरात याबाबत डोळेझाक करण्याचीच भूमिका संबंधित अधिकारी घेत असल्याचा आरोप करुन आरटीओ अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दती विषयीही प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरांतर्गत बससेवेची आवश्यकता...
एका बाजुस अंबरनाथच्या वेशीपर्यंत तर दुसरीकडे बदलापूर वांगणी रस्त्यावरील चामटोली पर्यंत बदलापूर शहराचा विस्तार झाला आहे. पश्चिमेकडील एरंजाड आणि बदलापूर गावही रेल्वे स्थानकापासून दूर आहे. मात्र, शहरांतर्गत प्रवासासाठी अन्य परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने रिक्षा प्रवास हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शहरांतर्गत बससेवेची आवश्यकता आहे. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने पाहत नसल्याची खंतही प्रवासी व्यक्त करीत आहेत.