मिटा डोळे नि खावा नीट

 ज्या देशात, प्रांतात, राज्यात, जिल्ह्यात, तालुवयात जे पिकते, मिळते, उपलब्ध होते ते त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या सेवनात-प्राशनात येते. कुणी काय खावे, काय प्यावे, काय खाऊ-पिऊ नये हा ज्याचा त्याचा/जिचा-तिचा प्रश्न आहे. त्याबद्दल कुणी कुणाला उगाचच शिकवायला जाऊ नये. ज्याच्या पोटाला जे पचेल तो ते खाईल. लोकांना, समाजाला, देशाला उपद्रव होईल, जाचक ठरेल असे काही बाही जाहिरपणे खाऊन/पिऊन कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही एवढे भान मात्र प्रत्येकाने बाळगायलाच हवे.

   गोष्ट २०१५ सालच्या मे महिन्याच्या शेवटाची आहे. तेंव्हा मी माझ्या मित्र आणि परिवारासह महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेलगत असणाऱ्या सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. हे स्थान प्रत्यक्षात गुजरात राज्यात येते. तेथे मांसाहार बंदी आहे म्हणे! तशी बंदी अनेक ठिकाणी अनेक गोष्टींवर असते. पण ती केवळ कागदावर! त्या बंदीतून सुटकेचे अनेक मार्ग असतात. सापुतारा येथे पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक तीन किलोमीटर आपापल्या गाड्या घेऊन महाराष्ट्राच्या सीमेत येतात. तेथे एकाहुन एक सरस मांसाहारी जेवण देणारे धाबे, हॅाटेले सर्वांची क्षुधा शांती करण्यासाठी मौजुद असतात. आम्ही ज्या हॉटेलात जेवायला गेलो होतो..त्याच्या मालकाला मी कुतुहलापोटी विचारले की इथे येणारे लोक कोणकोणत्या प्रकारचे असतात. तर तो म्हणाला की सर्व प्रकारचे! घरी मांसाहार करायला मिळत नाही म्हणून येणारे, बायकोला चालतं..पण आईला चालत नाही म्हणून बाहेर खाणारे, खानदानात मांसाहार चालतच नाही..पण मला आवडते म्हणून येणारे, धर्मात सांगितलंय की मांसाहार करु नको; पण आम्हाला खायचंय म्हणून येणारे, मित्रांसोबत चिकन-मटण-मासे खायला आवडतं म्हणून येणारे, सापुतारामध्ये खाता येत नाही म्हणून येणारे वगैरे वगैरे! आम्ही गेलो होतो तो महिना मे असला तरी संध्याकाळच्या वेळी गारेगार बोचरे वारे सुटले होते..म्हणून आम्ही चिकन सूपचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली आणि पुढच्या लज्जतदार पदार्थांची ऑर्डर देऊन ठेवली.

   याहीपूर्वी अनेकदा याच स्तंभातून या विषयावर लिहुन झाले आहे. कुणी काय खावे, काय प्यावे, काय खाऊ-पिऊ नये हा ज्याचा त्याचा/जिचा-तिचा प्रश्न आहे. त्याबद्दल कुणी कुणाला उगाचच शिकवायला जाऊ नये. यातून शिकवणाराच तोंडावर आपटण्याची शक्यता जास्त. लोकांना, समाजाला, देशाला उपद्रव होईल, जाचक ठरेल असे काही बाही जाहिरपणे खाऊन/पिऊन कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही एवढे भान मात्र प्रत्येकाने बाळगायलाच हवे. कारण अलिकडे मद्यप्राशन करुन वाहने चालवीत अनेक निष्पापांच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे त्या गोष्टीची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. ज्या देशात, ज्या भूभागात जे पिकते, मिळते, उपलब्ध होते ते त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या सेवनात-प्राशनात येते. कोकण हा समुद्रकिनाऱ्यालगतचा भूभाग आहे. तेथे नद्या, खाड्यांचे प्रमाणही खूप. त्यामुळे तेथे मासळी सहज उपलब्ध होते. नारळ, आंबे, जांभळे, जाम, सुपाऱ्या, काजू, फणस, ताडगोळे हा सारा ऐवज कोकणात विपुल प्रमाणात! म्हणून या साऱ्या बाबी स्थानिकांच्या सेवनात स्वाभाविकपणे येणारच! मराठवाडा, विदर्भ, खानदेश येथे जे अन्नपदार्थ शेतीद्वारे मिळतात किंवा कुक्कुटपालन, शेळ्या-मेंढ्यापालन वा तत्सम व्यवसायातून उपलब्ध होतात, ते तेथील जनतेच्या खाण्यात येणे स्वाभाविक आहे. त्यावर कुणाची सक्ती, जबरदस्ती असू नये. ज्याच्या पोटाला जे पचेल तो ते खाईल. येथे जात, धर्म, वर्ण, भाषा यांचे अडथळे येत नाहीत. पण अनेकांनी ते आणायचे प्रयत्न केले व गोंधळ निर्माण केल्याचीही उदाहरणे आहेत. आपल्याकडे बहुसंख्येने मांसाहारी लोक अंडी, मासे, खेकडे, काेंबड्या, शेळ्या-मेंढ्या-बकरे आदि प्रकार सेवन करणारे आहेत. काही धर्माच्या लोकांना बैल, गायी, म्हशी, रेडा, डुक्कर यांचेही मांस खाणे आवडत असते व ते मिळण्याची दुकानेही विविध शहरांमध्ये असतात. फ्रोझन फुड स्वरुपातही ते पुरवणारी आऊटलेट्‌स जागोजागी आहेत.

   सर्वसाधारणपणे हिंदु धर्मात ब्राम्हण वर्ग मांसाहार करीत नाही असे समजण्याचा प्रघात आहे. पण त्यांच्यातही कालांतराने बदल घडले असून अनेक लेखक विनोदाने म्हणतात की ‘अलिकडे सदाशिव पेठेतून म्हणे मटणाचा वास जास्त येत असतो.' अनेक ब्राह्मण महिलाही बिनदिवकतपणे मांसाहार करु लागल्या असून त्यामुळे काही कुणाचा धर्म वगैरे रसातळाला गेला नाही, हे वास्तव आहे. २००८ साली परभणी येथे अखिल भारतीय ब्राह्मण संमेलन झाले होते, त्याचे बीजभाषण करण्यासाठी त्यावेळी दै. लोकसत्तेचे संपादक असणाऱ्या श्री कुमार केतकर यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी ‘प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस भक्षण करीत असत' असा मुद्दा त्या भाषणात मांडला व ‘भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रवि शास्त्री हा ब्राह्मण असून तो गोमांस खातो' असे आपल्या भाषणात सांगितले. त्यावर तेथे उपस्थित असलेले अभिजन लोक खवळणे, आक्रमक बनणे स्वाभाविक होते. केतकरांना तेथे घेरले गेले, तेथून बाहेर पडणे मुश्किल बनले होते. मग श्री. केतकरांनी तत्कालिन उपमुख्यमंत्री-गृहमंत्री आर आर आबा पाटील यांना फोन करुन वस्तुस्थिती सांगितली व बंदोबस्तात मग तेथून ते सुखरुप निघाले. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात ‘साप्ताहिक लोकप्रभा'मध्ये नेने नावाच्या लेखकाने लिहिलेला एक लेख वाचनात आला होता. त्यात त्याने परदेशात गेल्यावर मागवलेल्या डिशमधल्या अस्वलाच्या पंज्यावर ताव कसा मारला याचे रसभरीत वर्णन होते. विख्यात साहित्यिक नाटककार अभिनेते संगीतकार पु. ल. देशपांडे हेही मत्स्यप्रेमी असल्याचे त्यांनीच लिहुन ठेवलंय.

   माझे शालेय-महाविद्यालयीन शिक्षण विविध जाती-धर्माच्या मुला-मुलींसोबत झाले आहे. अनेकांशी गट्टी जमली, अजूनही मैत्री कायम आहे. यात कुठेही आहाराचा मुद्दा आडवा आला नाही. बी.ए. अंतिम वर्षाचे शिक्षण मी डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयातून घेतले. मानसशास्त्र स्पेशल घेऊन बी.ए. करणाऱ्या आमच्या त्या वर्गात मी एकटाच मुलगा व सात मुली. त्यात सहा ब्राह्मण व एक सीकेपी. आम्ही एकत्र बसून डबा खात असू. त्यातल्या काही मुली मला सांगत..‘तुझ्या आईला जरा जास्त आम्लेट बनवून डब्यावर द्यायला सांग ना, आम्हाला आम्लेट आवडते. पण आम्हाला घरी खाता येत नाही. बाहेर कुठे जाऊन खायची सोय नाही. अधूनमधून जवळा, बोंबिल अशी सुकी मासळीही आणत जा डब्यावर!' हे सगळे मी नेले की त्या पोरी माझा डब्याचा सुपडा साफ करुन टाकत असत व मला त्यांच्या डब्यातली शेपूची, तेंडलीची, कोबीची भाजी खावी लागत असे. ही १९८३ सालची गोष्ट आहे.  

   सांगायचे तात्पर्य हेच की ज्यांचे मन ज्या गोष्टी खाण्यासाठी धाव घेते त्यांनी ते खुशाल खावे, उगाच तत्वचिंतकाच्या भूमिकेत शिरु नये. ‘ते तसलं मांस मच्छर आम्ही खात नाही' असे सुनावणारे शाकाहारी विद्वान विरुध्द मांसाहारी हा वाद पुरातन आहे. मूळ शिवसेनेतून जसे एकनाथ शिंदेंकडे अनेक आमदार फुटुन गेले किंवा शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादीतून अनेक आमदार अजित पवारांसोबत निघून गेले तसे अनेक जन्मजात शाकाहारी लोक त्यांच्या मूळ पंथातून फुटुन मांसाहारी बनले आहेत; तर अनेक पिढीजात मांसाहारी लोक पंढरपूरला जात माळा घालून शाकाहारी झाले आहेत. काही विद्वान लोक मांसाहारी लोकांना हिणवताना ‘तुम्ही अन्नकोषात गुरफटलेले जीव, हिंसा करणारे लोक, मनावर कसलाच ताबा-संयम नसणारे पापी' वगैरे जड जड शब्द वापरताना मी ऐकले आहे. त्यावर मग ‘दह्यामध्ये शेकडो जीवजंतू असतात..जंतू असल्याशिवाय दुधाचे दही बनतच नाही..ते बरे तुम्हाला चालते, जे पाणी तुम्ही पिता ते ज्या धरणातून येते त्या धरणात डोंगरातून घसरुन पडलेले गाय, बैल, बकऱ्या बुडुन मरतात...तिथेच पाण्यात कुजतात, अनेक मासे आणि विविध जलचर तेथे आपले सारे विधी उरकतात..तेच पाणी नळातून तुमच्या घरी येते; कांदा-लसूण-भाज्यांमध्येही जीव असतो..ते कसे चालवून घेता?' असे प्रश्नही अखिल विश्व मांसाहारी संघटनेचे सदस्य उपस्थित करतात.

   या सगळ्याचा मी जवळून अनुभव घेतला आहे. शाकाहार किंवा मांसाहार यात कुणा एकाची बाजू घेण्याऐवजी मी सरळ मिश्राहार पसंत करतो. म्हणजे बघा.. ठाण्याच्या कुंजविहारचा बटाटावडा, मामलेदार मिसळ, सासुरवाडी या नव्याने उद्‌घाटन झालेल्या नवी मुंबईतील हॉटेलांतील मासवडी, वाशीमधील वल्लीच्या दुकानातले मेदूवडे-इडल्या; क्षीरसागर हॅाटेलातील मसाला डोसे, चितळेंच्या आऊटलेट्‌स मधल्या बाकरवड्या, प्रशांत कॉर्नर मधील मिठाया, हरिभाई कंदोईच्या दुकानातला फाफडा वगैरेवर आपण डोळे झाकून तुटुन पडतो; तसेच चेंबूरच्या सिंधी कॅम्पमधील हातगाडीवर मिळणारी वजडी-कलेजी-पेटा, सीवुड्‌स दारावे रेल्वे स्टेशनबाहेर ठेला लावून असलेल्या मंजीबाई म्हात्रे यांच्याकडील भाकऱ्या, कोळंबी, चिंबोऱ्या, मासळी फ्राय; विश्व ज्योती हॉटेलातील चिकन-मटणाचे विविध प्रकार आणि पत्रकार परिषदांनिमित्त मुंबईतील ताजमहाल, ताज लॅण्डस, ताज प्रेसिडेण्ट, जे डब्ल्यु मेरियट, सहारा, वरळीचे फोर पॉईण्टस्‌, रिनेसान्स, अंबॅसिडर, इंटर कॉन्टिनेन्टल, आय टी सी मराठा,  रिट्‌झ या आणि अशा तारांकित हॅाटेलांतील एकाहुन एक सरस देशी विदेशी मांसाहारी रेसिपींची लज्जत मी शेकडो वेळा घेतली आहे. कोकणी मुस्लिम साहित्यिकाच्या घरी जाऊन केपसा (चिकनचा समावेश असलेला लज्जतदार पुलाव ) प्रकारही  चाखला आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की ‘उदरंभरणं नोहे जाणिजे यज्ञकर्म' अशा भूमिकेत शिरुन आस्वाद घ्या. खत्रुडासारखे कुणाच्याही अन्नाला उगाच नावे ठेवत बसू नका. मिटा डोळे नि खावा नीट!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बालकांअगोदर पालकांनी संस्कारांचे महत्त्व समजणे अत्यंत गरजेचे