डोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलन
डोंबिवलीः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून स्थानकाबाहेरील १५० मीटर अंतराच्या आत बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे. या कारवाईने त्रस्त झालेल्या फेरीवाल्यांनी ९ जानेवारी रोजी इंदिरा चौकात मोर्चा काढला. यावेळी आंदोलक फेरीवाल्याच्या शिष्टमंडळाने सहायक आयुक्त संजय कुमावत यांना निवेदन दिले. सदर प्रकरणी महापालिका उपायुक्त यांना माहिती देऊ, असे आश्वासन कुमावत यांनी दिल्याचे फेरीवाले आंदोलकांनी सांगितले.
हॉकर्स आणि भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात अनेक फेरीवाले सामील झाले होते.डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात मोर्चा आल्यानंतर अध्यक्ष कांबळे यांनी सहायक आयुक्त कुमावत यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील पथविक्रेता (फेरीवाले) यांचे कायद्याने प्रत्येक पाच वर्षांनी सर्वेक्षण नोंदणी करावी असे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका माध्यमातून २०१४ साली अशाप्रकारे सर्वेक्षण केले. याला आता दहा वर्षे उलट्यानंतरही पालिका प्रशासन शांत आहे.पुन्हा सर्वेक्षण नोंदणी करण्यास टाळाटाळ होत आहे. कष्टकरी पथविक्रेताचे (फेरीवाल्यांचे) सर्वेक्षण झाले नाही तर परवाना व ओळखपत्र कसे मिळेल ? नव्याने सर्वेक्षण झाले तर अपडेट डाटा पालिकेला उपलब्ध होईल, त्याप्रमाणे धोरण राबवता येईल असे नमूद करीत फेरीवाल्यांची सर्वेक्षण नोंदणी करावी व परवाना देण्यात यावा, अशी मागणीनिवेदनाद्वारे केली आहे. सदर गंभीर विषयाकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष न करता मार्ग काढावा. तसेच कष्टकरी फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने आयुक्तांनी जातीने लक्ष घालावे अशी विनंती कांबळे यांनी फेरीवाल्याच्या वतीने महापालिका आयुक्तांना केली आहे.