घरांच्या किंमती कमी करण्यासाठी ‘सिडको'ला निर्देश द्या
नवी मुंबई : ‘सिडको'ने जाहीर केलेल्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर' या महागृहनिर्माण योजनेतील २६ हजार घरांच्या किंमती कमी करण्याबाबत सिडको व्यवस्थापनाला निर्देश देण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रववते रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘सिडको'ने उलवे, तळोजा, खारघर, करंजाडे, वाशी येथे गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी केली आहे. ८ जानेवारी ‘सिडको'ने जुईनगर रेल्वे स्टेशनजवळील सदनिकांचा अपवाद वगळता खारघर, तळोजा, वाशी येथील सदनिकांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. २५ लाखांपासून १ कोटीपर्यंत या सदनिकांच्या किंमती ठरविल्या आहेत. या किंमती म्हणजे ‘सिडको'च्या सदनिका आहेत की खासगी बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांंच्या किंमती आहेत. ‘सिडको'ने आजवर बांधलेल्या सदनिकांच्या किंमती या सर्वसामान्यांच्या आवाक्यात होत्या, त्यांना परवडणाऱ्या होत्या. परंतु, नुकत्याच जाहीर केलेल्या घरांच्या किंमती पाहता या सदनिका विकत घेणे अत्यल्प, अल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहिवाशांनाही शक्य नाही, असे रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘सिडको'ने जाहिर केलेल्या किंमतीमध्ये त्याच ठिकाणी खासगी बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये सदनिका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ‘सिडको'ने सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घर केवळ कागदोपत्रीच ठेवले असून आपला आता यापुढील काळात केवळ नफा कमविण्याचा हेतू असल्याचे जाहिर झालेल्या घरांच्या किंमतीवरुन स्पष्ट होत आहे. ‘सिडको'ने जाहिर केलेल्या किंमती पाहता सर्वसामान्यांना यापुढे ‘सिडको'च्या सदनिका विकत घेणे शक्य होणार नाही. ज्याला १ लाख रुपये वेतन त्यालाही खारघर, वाशीतील सदनिका विकत घेणे अशक्य आहे. त्यामुळे आपण नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून ‘सिडको'ला जाहिर केलेल्या घरांच्या किंमतीचा फेरविचार करण्याचे आदेश देवून सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमती निश्चित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
‘सिडको'चा केवळ पैसे कमविण्याचे उद्देश असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नवी मुंबईत रस्त्यावर उतरुन ‘सिडको'साठी भीक मागून पैसे गोळा करुन देवू. ‘सिडको'च्या जाहिर झालेल्या घरांच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये सिडकोप्रती असंतोष निर्माण झाला असून लोक संताप व्यक्त करु लागले आहेत. सिडकोने सदनिका विक्रीसाठी खासगी कंपनीची नियुक्ती करुन त्याला काही कोटींची फी दिलेली आहे. सदरची फी वसुल करण्यासाठी तर ‘सिडको'ने या सदनिकांची भरमसाठ किंमत लावली असल्याचा संशय व्यवत होत आहे. ‘सिडको'ने घरांच्या किंमती कमी न केल्यास सिडको मुख्यालयासमोर ‘काँग्रेस'तर्फे जनआंदोलन छेडले जाईल.
-रविंद्र सावंत, प्रववते-नवी मुंबई जिल्हा काँग्रेस.