महापालिका राबविणार १०० दिवसांचा कृती कार्यक्रम

नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता

ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिका कडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख यांची आढावा बैठक ८ जानेवारी रोजी माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले.

बैठकीच्या आरंभी आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केले. नागरिकांचे जीवन सुखकर करणे (इज ऑफ लिव्हिंग) याला प्राधान्य आहे. आपल्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे. प्रशासन सुसंगत पध्दतीने काम करीत असल्याचे नागरिकांना जाणवले पाहिजे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात नागरी सुविधांबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करुन नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात, ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी शक्यतो फिल्ड व्हिजीट ठेवू नयेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. तसेच महापालिका क्षेत्रात उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी, असेही या कृती कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे.

मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट ८५७ कोटी रुपये असून आतापर्यंत ५७६ कोटींची वसुली झाली आहे. पाणी बिलांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य २२५ कोटी रुपये असून त्यापैकी ८० कोटींची वसुली झालेली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आपण आलो आहोत. मालमत्ता कर आणि पाणी बिल यातून येणारा महसूल महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्ट पूर्ती तातडीने व्हावी. परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षीची रक्कम आणि थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करावा. आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करणे या कारवाईही करण्यात याव्यात. तसेच प्रलंबित वसुली, त्यातून वसुलीची शक्यता, त्यासाठीचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधून पुढील २ महिन्यांच्या काळात वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करावे.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांना निवेदन