‘आपली नवी मुंबई-आपला अर्थसंकल्प'

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा गुणात्मकदृष्ट्या उत्तम राखण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ज्या नागरिकांसाठी सदर सुविधापूर्ती केली जाते, त्या नागरिकांच्या विचारांचाही शहर विकास प्रक्रियेत सहभाग असावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने ‘आपली नवी मुंबई-आपला अर्थसंकल्प' अशी अभिनव संकल्पना जाहीर करण्यात येत आहे.

प्रत्येक नागरिकाला आपण राहत असलेल्या शहराविषयी आपलेपणा वाटत असतो. त्यात नवी मुंबईसारखे सर्वत्र नावाजले जाणारे शहर असेल तर शहराविषयीचा अभिमान अधिक दृढ होतो. त्यामुळे आपले शहर अधिक सुंदर आणि आधुनिक व्हावे अशी प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. या अनुषंगाने ‘नमुंमपा'च्या आगामी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया सुरु होत असताना शहरातील डॉक्टर्स, आर्कटिेक्ट, वकील, बिल्डर्स अशा विविध व्यावसायिकांच्या संघटना तसेच साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, महिला-बालविकास, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था, संघटना, मंडळे यांनी आपल्या मौल्यवान सूचना दिल्यास नागरिकांच्या मनातील शहर विकासाच्या संकल्पना समजू शकतील. त्यामधील सर्वसमावेशक अशा सुयोग्य संकल्पनांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करणे शक्य होईल.

त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ‘आपली नवी मुंबई-आपला अर्थसंकल्प' अशी अभिनव संकल्पना जाहीर केली असून शहरातील विविध स्वरुपाचे काम करणाऱ्या संस्था, संघटना नवी मुंबई शहर विकासासाठीच्या आपल्या सूचना, संकल्पना मा. आयुक्त यांचे नावे लेखी स्वरुपात ‘आपली नवी मुंबई-आपला अर्थसंकल्प' याकरिता सूचना असे लिफापयावर नमूद करुन नवी मुंबई महापालिका मुख्यालयात तळमजल्यावरील आवक-जावक टपाल कक्षात प्रत्यक्ष सादर करु शकतात अथवा [email protected] या ई-मेलवर पाठवू शकतात.

त्याचप्रमाणे ‘नमुंमपा'च्याhttps://www.nmmc.gov.in/navimumbai/feedback या लिंकवर क्लिक करुन अभिप्राय (Feedback) सेक्शनमध्ये आपल्या सूचना नोंदवाव्यात. याशिवाय महारपालिकेच्या My NMMC (माझी नवी मुंबई) या ॲप वरही आपले अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सूचना वेबसाईट आणि ॲपवर नोंदविताना सुरूवातीला ‘आपली नवी मुंबई-आपला अर्थसंकल्प याकरिता सूचना' असे नोंदविणे आवश्यक राहील. १७ जानेवारी २०२५ पर्यंत लेखी अथवा ऑनलाईन स्वरुपात सूचना नोंदविता येतील, याची नोंद घ्यावयाची आहे.

संस्था, संघटना, मंडळे यांच्यामार्फत प्राप्त सूचनांची छाननी करुन त्यामधील शहर विकासाच्या दृष्टीने सर्वसमावेशक आणि उत्तम सूचनांबाबत महापालिका आयुक्त संबंधितांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत. ‘नमुंमपा'चा अर्थसंकल्प लोकाभिमुख असावा आणि त्यामध्ये नागरिकांच्या मौलिक सूचनांचे प्रतिबिंब असावे, असा दृष्टीकोन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी जपला आहे. नवी मुंबईतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना, मंडळे यांनी आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवी मुंबई शहराला सर्वोत्तम बनविण्यासाठी आपल्या मौलिक सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका राबविणार १०० दिवसांचा कृती कार्यक्रम