काखेत कळसा अन् गावाला वळसा
वाघ पाहायला मिळावा म्हणून अनेकजण काय काय व्याप करत असतात. तीन तीन जंगल सफारी एका वर्षात करुनही वाघोबाने लेखकाला काही दर्शन दिले नव्हते. पेंचच्या जंगल सफारीत तर ड्रायव्हरने वाघाऐवजी काय दाखवले? तर चार महिन्यापूर्वीच्या वाघाच्या लेंड्या! वाघ दिसला शेवटी. पण कुठे? तर लेखकाचे गाव असलेल्याच भागात..त्याच्या घराच्याच जवळपासच्या भागात!
गेल्या वर्षभरात माझ्या तीन जंगल सफारी झाल्यात. त्यात पहिलं नागपूर वनामतीच्या प्रशिक्षणा दरम्यान ‘उमरेड भिवापूर'चं जंगल; त्यानंतर पाच-सहा महिन्यातच दुसरी सफारी ठिबक व तुषार सिंचन संच तपासणीच्या निमित्तानं ‘पेंच' च्या राखीव जंगलाची अन् तिसरी अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत ट्रेनिंगमध्ये असताना एका रविवार सुट्टीच्या दिवशी केलेली ‘मेळघाटची सफारी' कायमच स्मरणात राहतील.
कारणही तसंच आहे त्याला भिवापूरच्या पहिल्या सफारीत बरंच काही दिसेल असं डोक्यात ठेवून गेलो; पण फक्त एक रानमांजर दिसलं अन् तेवढ्यावरच आमची जंगल सफारी संपली. दुसऱ्या पेंचच्या सफारीत नक्की वाघोबा दिसेल म्हणून सगळ्या जंगलातून जाताना प्रत्येक वेळी पापणी पडताना बंद झालेले डोळे मी क्षणाचाही विलंब न करता लगेच उघडायचो; चितळ, सांबर, घुबड, रानडुक्कर, पेंच मधल्या धरणात मगर असं बरंच काही दिसलं. जंगलाच्या ऐन मध्यावर अचानक गाईडने ड्रायव्हरला गाडी थांबवायला भाग पाडलं. आम्हाला वाटलं त्याला वाघ दिसला. म्हणून हळूच इशारा केला असावा पण गाडीच्या पुढच्या टायरच्या बाजूला वरून खाली बोट करून दाखवत "साहेब, ह्या वाघाच्या लेंड्या बघा.” आम्ही सर्वच जण आश्चर्यचकित झालो. वाघ दाखवायचं सोडून हा काय लेंड्या दाखवतोय आम्हाला? तसं पाहिलं तर त्या घडीला पावसाळा संपून पाच सहा महिने होऊन गेले असतील. म्हणजे ती वाघाची लेंडी कमीत कमी चार-पाच महिन्यांची असावी अन् त्या गाईडने त्यांचा वापर सफारीतल्या आमच्यासारख्या जंगलात काहीही प्राणी न दिसलेल्या लोकांना बऱ्याचदा केलेला असावा. मनात विचार केला दुधाची तहान ताकावर असं आजपर्यंत ऐकलं होतं पण वाघ बघण्याची इच्छा अन् भागली ती लेंड्यांवर येऊन!
तिसऱ्या मेळघाटच्या सफारीत तर गवा सोडून काहीच दिसलं नाही! पहाटे पाचच्या अंधारात कोल्ह्यानं तोंड दाखवलं अन् शकुन झाला की अपशकुन हे समजलं नाही परंतु सर्व जंगल सफारी होऊनही डोळ्यांचे पारणे फिटले नाही, याचं मनोमन शल्य बोचू लागलं. काय करणार? जंगली प्राण्यांना थोडंच आपण येणार असं स्वप्न पडतंय काय? नक्कीच नाही. त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत फिरताना ते सफारीच्या वेळेला दिसले तर योगायोग समजावा नाहीतर सगळं काही नशिबावर सोडून पुन्हा पुढच्या जंगल सफारीची तयारी करावी असं हौशी पर्यटकांनी डोक्यात ठेवावं.
अगदी काल परवा पुन्हा उमरेड भिवापूरला जाण्याचा प्रसंग आला; परंतु माझं मन काही जंगल सफारीला राजी होईना. मधून मधून वाटायचं जाऊ.. पण पुन्हा मला एवढ्या सफारीत फक्त दिसलेलं आठवायचं अन् मी पुन्हा माझ्या मनात नकारघंटा वाजू लागायची. म्हणून यानंतर फक्त महाराष्ट्रातलं ताडोबा जेव्हा जमेल तेव्हा जाऊ असं मनाशी ठरवलं अन् मी संभाजीनगरला आलो. एक दिवस मुक्काम करून पुन्हा दोन दिवस सुट्टीच्या निमित्ताने मुळगावी खांब्याला जायचं म्हणून बेत आखला. घरी पाहुणे आलेले गावातले दाजी अन् नानांसोबत (वडील) गप्पा झाल्या. दिवस टेकायला आला म्हणून दाजी मला म्हणले, "नेवरती, मला मोटरसायकलवर घरापर्यंत सोड चाल.” असं पाहुण्यांनी बोलल्यावर मीही त्यांना गाडीवर बसवलं अन् त्यांच्या घराकडे निघालो.
आमच्या घरापासून त्यांचं घर तसं तीन किलोमीटर गावातल्या शिवारातच. जवळपास तीन हिस्से लोकसंख्या ज्याच्या त्याच्या शेतात राहणारी. आपल्या आपल्या शेतात राहीलं म्हणजे संध्याकाळपर्यंत कामधंद्याला वेळ जास्त मिळतो; गावात राहिलं म्हणजे मळ्यात दररोज येण्या-जाण्यात जाणारा वेळही वाचतो; गावात राहिलं म्हणजे रिकामटेकड्या गप्पांना जास्त वाव..अशा बऱ्याच कारणांनी लोकांनी आपापल्या रानाच्या वस्तीचा पर्याय शोधला. गावाच्या दोन्हीं बाजूला उंच उंच डोंगर रांगा आणि खाली उंच सकल भागात ओढे- नाले, पानवठे दाट झाडी अशी आमच्या खांब्याची भौगोलिक परिस्थिती. त्यात सध्या प्रत्येकाच्या घरी गायांचा दूध धंदा चांगलाच लावून धरला आहे. सुरुवातीच्या काळात गायांना कोरडी चारा वैरण, सुग्रास अन् हिरवा घास हे सोडून दुसरं काही नसायचं. गेल्या पाच सात वर्षांपासून मक्याचा मुरघास बनवायची कला सर्वांनी आत्मसात केली. म्हणून उन्हाळ्यात सुद्धा आता गायांना त्याचा चांगला आधार मिळतो. मुरघास बनवायचं तंत्र तसं पाहिलं तर खूप जुनं त्या काळात म्हणावी तशी गरज भासली नाही; पण आता मका आणि मुरघास याशिवाय दूधधंदाच राहिला नाही.
मोटरसायकलवर पाहुण्यांना सोडवायला जाताना चांगलाच अंधार पडला होता. त्यात शेतकऱ्याची कामधंद्याच्या रगड्यात धुमसून वापरलेली मोटार सायकल म्हणजे हेडलाईटच्या बाबतीत बऱ्यापैकी आंधळी झालेली असते. गावाच्या पुढे ओढा ओलांडून निघाल्यावर दोन्ही बाजूंनी मक्याची शेती त्यात गाडीचा उजेड जमतेम; त्यात थंडीने चांगलाच जोर धरला म्हणून मी काकडलो होतो. मक्याची शेतं सुरू झाल्यावर दाजींना त्या बांधावरच्या अरुंद पावटीवर दूर कुत्र्यासारखं पांढरं दिसलं अन् म्हणले, "अरे नेवरती, कुत्रं हाये वाटतं.” माझं तिकडं एवढ्या दूरवर लक्षच नव्हतं. छोट्या पावटीने गाडी चालवायची म्हणून लक्ष अगदी टायरच्या दहा-वीस फूट पुढे एवढंच माझं नजरेच्या टप्प्यात; पण दाजी असं बोलल्यावर मी समोर पाहिलं तर आमच्याकडे तोंड करून लांब शेपटीचा बिबट्या येताना दिसला. एक तर मी थंडीने गांगारून गेलो होतो अन् त्यात बिबट्या महाराज आमच्याकडे डोळे रोखून बघत होता! दाजी मागच्या मागे उतरून थोडं अंतर मागे गेले. मी गाडी तशीच सुरू ठेवली. उलट्या बाजूने जेवढी गाडी दोन्ही पायांनी मागे लोटता येईल तेवढी नेत होतो; परंतु ती आहे त्या रस्त्याने सरळ न जाता वाकडी तिकडी होऊ लागली. शेवटी बिबट्यालाच आमची दया आली असावी अन् त्याने तिकडं तोंड फिरवलं. हळूहळू तो बिचारा पुन्हा मवयाच्या शेतात निघून गेला.
मागे जावं की पुढे हे कितीतरी वेळ मला समजत नव्हतं. शेवटी समोरून गावात नेणारे दोन-तीन जण आले अन् आम्हाला चांगलाच आधार मिळाला. तरीही पुन्हा पुन्हा तो शेपूट दिमाखात उंच करत आरामशीर वाघोबासारखा चालणारा बिबट्या मला दिसायचा! शेवटी देवाचं नाव घेऊन गाडी काढली अन् सुखरूप बहिणीच्या घरी पोहोचलो. तिथं गेल्यावर सहज विचार आला तीन-तीन जंगल सफाऱ्या करूनही शेवटी बिबट्या माझ्याच शिवारात दिसला याचं नवल वाटलं. म्हणतात ना काखेत कळसा अन् गावाला वळसा!
-निवृत्ती सयाजी जोरी