पुस्तक परिचय.....श्रीनर्मदा परिक्रमा एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा
नर्मदा परिक्रमा ह्या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे नर्मदेला उजव्या हाताला ठेऊन तिच्या भोवताली घातलेली प्रदक्षिणा ! गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा आणि कावेरी ह्या भारतातील पाच प्रमुख पवित्र नद्या आहेत. भौगोलिक कारणांमुळे ह्यांपैकी प्रत्यक्ष परिक्रमा ही केवळ नर्मदेचीच करता येत असल्याने नर्मदा परिक्रमेला विशेष आध्यात्मिक महत्व आहे. पद्मपुराणात असं म्हटलं आहे की, सरस्वतीमध्ये तीन दिवस स्नान केल्याने, यमुना नदीत सात दिवस स्नान केल्याने आणि गंगा नदीत एकदा स्नान केल्याने मनुष्याची पापकर्म धुतली जातात. पण नर्मदा नदीच्या बाबतीत मात्र तिच्या केवळ दर्शनाने हे साध्य होतं.
नर्मदा नदीचा उगम अमरकंटकपासून होतो. भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी म्हणून नर्मदा नदीचा उल्लेख होतो. तिची लांबी १, ३१२ कि.मी. एवढी आहे. गुजराथमध्ये भडोच जिल्ह्यातील अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी ही नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजराथ ह्या राज्यांमधून वाहते.तिचं पात्र सुमारे ९८, ८०० चौरस कि.मी. पसरलेलं आहे. तिचं मुख खंबातच्या आखातात आहे.
नर्मदा नदीच्या किनारी अनेक साधुसंतांनी आपल्या तपश्चर्येने शक्तिनिर्मिती केल्यामुळे तिचा परिसर हे एक शक्तिस्थळ बनलं आहे. सत्कर्माच्या दृष्टिकोनातून व ‘नर्मदा मय्या' नामक शक्तीला केंद्रस्थानी ठेवून संकल्पपूर्वक केलेली परिक्रमा साधकांच्या अनुभव विश्वात निश्चितच आध्यात्मिक भर घालणारी ठरू शकते त्यामुळे अनेक वर्षांपासून ‘श्रीनर्मदा परिक्रमा' हा उपक्रम विविध संस्थांतर्फे राबवला जात आहे. अनेक भाविक छोट्या मोठ्या समूहातर्फे सुध्दा असे उपक्रम राबवत असतात.
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सन २०११ साली सुमारे ३२० जणांच्या समूहाने चाळीस दिवसांची नर्मदा परिक्रमा आयोजित केली होती. या उपक्रमात सगुण सद्गुरूंचं साहचर्य, यज्ञसाधनेचं अधिष्ठान आणि प. प. श्रीमत वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे ) स्वामी महाराज यांच्या पादुकांसह परिक्रमेला निघालेली पालखी असलेल्या ह्या आनंदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचं ते नुसतंच भ्रमण नव्हतं, तर नर्मदा किनारी झालेल्या श्रीसद्गुरुंच्या ज्ञानदानयज्ञामुळे घडलेलं ज्ञानपूर्ण विहरण होतं.
सन २०११ साली परमपूज्य सदगुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी, यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे ‘सामूहिक श्रीनर्मदा परिक्रमा' बाबत सर्व वृत्तांत सद्गुरूंनी आपल्या शैलीत लिहिला असून इतर अनेक उपयुक्त माहिती ह्या ग्रंथात आहे. सर्व भाविकांनी आवर्जून वाचावा व संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे.
प्रथमावृत्ती... ११ जानेवारी , २०१५
पृष्ठ - ३४८ मूल्य - ४५० रुपये
-दिलीप प्रभाकर गडकरी