नवी मुंबई आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

नवी मुंबई : रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सफ्ताहानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नेरुळ येथील वाहन तपासणी केंद्रामध्ये व वाशी येथील मैदानी चाचणी केंद्रात नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  

या शिबिरात वाहन तपासणी केंद्रावरील शेकडो वाहन चालक तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील 60 बस चालक तसेच 100 पेक्षा अधिक रिक्षा व अवजड वाहन चालक सहभागी झाल्याने या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात नेत्र तपासणी दरम्यान दोष आढळणाऱया वाहन चालकांना आरटीओ कार्यालयामार्फत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा सप्ताह हा रस्ता सुरक्षेबद्दल जागरुकता वाढवून भारतीय रस्त्यांवर सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्यास मदत करत असल्याचे तसेच अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यास मदत करत असल्याचे यावेळी सांगितले. रस्ते अपघातांचा उत्पादनक्षमता आणि आर्थिक वाढीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सफ्ताह हे केवळ सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी नाही तर देशाच्या आर्थिक विकासासाठीही महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी सांगितले.  

तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाचे वाहन चालक व नागरिकांची सुरक्षा हे मुख्य उद्देश असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील असल्याचेही सांगोलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी रस्ता सुरक्षा विषयावर उपस्थित असलेल्या सर्व वाहक, चालक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये श्री सत्य साई बुक्स अँड पब्लिकेशन्स ट्रस्ट व रामकृष्ण नेत्रालय अँड केअर यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व चष्मा वाटपासाठी सहकार्य केले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात भाजीपाला दरात घसरण