युवकांनो! ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या
‘नशामुक्त नवी मुंबई' अभियानचे उद्घाटन
नवी मुंबई : देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रुशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स आणि तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी युवकांनो सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या. ती देखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले.
‘नवी मुंबई पोलीस आयुक्तालय'तर्फे ८ जानेवारी रोजी वाशी मधील सिडको एविझबिशन सेंटर येथे आयोजित ‘नशामुवत नवी मुंबई' अभियानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
Art of silence या मुकनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर सदर उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस याच्या हस्ते ‘नशामुवत नवी मुंबई' अभियान चित्रफितीच्या प्रकाशनाने संपन्न झाले.
याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, प्रसिध्द अभिनेता तथा ‘नवी मुंबई पोलीस आयुक्तालय'तर्फे ‘नशामुवत नवी मुंबई'चे आयकॉन जॉन अब्राहम, आ. मंदाताई म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुवत संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, संजयकुमार पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, आदि उपस्थित होते.
ड्रग्समुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात, परंतु चांगले करण्यासाठी प्रवाहाविरुध्द जावे लागते. त्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद गरजेची आहे. ‘नशामुवत नवी मुंबई' अभियान अतिशय महत्वाचे आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत पोलिसांना निर्देश दिल्यानुसार आपल्याला ड्रग्स विरोधात मोठी लढाई लढायची आहे. सरळ लढाई करता येत नाही म्हणून अंमली पदार्थांद्वारे देश पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणुन भारत देश आज पुढे येत आहे. त्यामुळे भारत बलशाली होत आहे, भारताकडे वाकडी नजर करुन बघण्याची आज कुणाचीही हिम्मत नाही. देशातील युवा शक्ती अमली पदार्थाच्या आहारी गेल्यास त्यांच्यात कुठल्याही प्रकारची लढाई लढण्याची ताकद उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात सगळीकडे अमली पदार्थ वेगवेगळ्या मध्यामातून पसरवून देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन करुन देश आतुन पोखरण्याचा तसेच देशाचे भवितव्य हे युवा अवस्थेत संपवण्याचा डाव सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृह विभागासंबंधी घेतलेल्या बैठकीत कॅनडाचे उदाहरण दिले. ड्रग्जमुळे कॅनडा सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला आहे. मात्र, भारत ड्रग्ज विरोधातील लढाई जिंकू शकतो. देशातील सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करीत लढाई एकत्र लढायला हवी. सर्वांनी एकत्र येवून संपूर्ण भारत ड्रग्स मुक्त करायचा आहे, असा आपला निर्धार असायला हवा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८८२८ ११२ ११२ या टोल फ्री क्रमांकाचा ड्रग्ज विरोधातील मोहिमेत प्रभावी वापर करा, असे सांगत ना. फडणवीस यांनी नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल नवी मुंबई पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच सेलिब्रिटी म्हणून जॉन अब्राहम यांच्या कामाबद्दलही कौतुक केले.
तसेच पुनःश्च एकदा निर्धार करु या नशामुक्तीसाठी लढण्याचा, ड्रग्स फ्री नवी मुंबई करण्यासाठी सैनिक होण्याचे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले.
अभिनेता जॉन अब्राहम यांनी आपल्या मनोगतातून ‘नशामुवत नवी मुंबई' अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचेही अभिनंदन केले. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावे, असे आवाहन जॉन अब्राहम यांनी उपस्थित युवकांना केले.
तर चांगल्या कामाचा ध्यास, हीच खरी नशा आहे. सर्वांनी चांगल्या कामाचा ध्यास घ्यावा. नवी मुंबई सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नशामुक्त अभियानातही अव्वल राहील, असा विश्वास ना. गणेश नाईक यांनी यावेळी व्यवत केला.
प्रांरभी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवी मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या ड्रग्स फ्रि या अभियानाची तसेच त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी ड्रग्स फ्रि नवी मुंबई या अभियांनाबाबत माहिती देतानाच गत दोन वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या अभियानात सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सोशल मिडीयाद्वारे अमली पदार्थाची तस्करी?
अमली पदार्थांच्या तस्कराविरोधात मोठया प्रमाणावर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तस्कारांनी आता सोशल मिडीयाद्वारे अमली पदार्थांच्या ऑर्डर घेण्यास तसेच कुरिअरच्या माध्यातून अमली पदार्थाची डीलीव्हरी करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने होणाऱया अमली पदार्थाच्या तस्करांविरोधात देखील मोहीम उघडण्यात आली आहे. मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरामध्ये अमली पदार्थाच्या विरोधात विक्रमी कारवाई केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.