आमदाराचा जनसंवादासाठी अनोखा पुढाकार

उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी यांनी आपल्या खाजगी गाडीतून उतरुन थेट उल्हासनगर महापालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास केला. आमदार आयलानी यांच्या या आश्चर्यकारक कृतीने शहरातील नागरिकांना आपलेपणाची जाणीव करुन दिली असून, त्यांच्या समस्या थेट आमदारांपर्यंत पोहोचल्याचा विश्वास दिला आहे.

भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी नेहमीच्या कार्यपध्दतींना फाटा देत स्वतःच नागरिकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यक्रमाहून परतताना त्यांनी उल्हासनगर महापालिका शाळा क्र.२४ येथे आपली खाजगी गाडी थांबवली आणि त्यांनी थेट महापालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास सुरु केला. बसमधील प्रवाशांसाठी तो क्षण विलक्षण होता. आमचा आमदार आमच्यासोबत बस प्रवास करतोय, अशी भावना प्रवासी नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. या प्रवासादरम्यान कुमार आयलानी यांनी नागरिकांशी संवाद साधला. बससेवेबाबत प्रवाशांची मते जाणून घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या.

शहरातील वाहतूक व्यवस्था, बससेवेचा दर्जा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे, असे त्यांनी प्रवाशांना आश्वासन दिले. यावेळी त्याच्यासोबत भाजपा उल्हासनगर शहर सचिव मनोज साधनानी, लखी नाथानी त्यांच्या सोबत होते.

बसमधील प्रवाशांनी कुमार आयलानी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या या कृतीतून त्यांनी संपर्क आणि संवाद असा राजकारणाचा मुलमंत्र ठळकपणे अधोरेखित केला. यामुळे इतर नेत्यांनाही लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

युवकांनो! ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या