विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती' उपक्रमाला प्रारंभ!

विरारः   मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी, या मागणीची तड लावण्यासाठी दर आठवडा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती' करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद' मध्ये एक हजारांपेक्षा अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील विरार येथील श्री जिवदानी देवी मंदिर मध्ये पालघर जिल्ह्यातील पहिली ‘सामूहिक आरती' श्री जिवदानी देवी संस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी रात्री करण्यात आली.

यावेळी ‘श्री जिवदानी देवी संस्थान'चे अध्यक्ष आणि ‘महाराष्ट्र मंदीर महासंघ'चे राज्य संयोजक प्रदिप तेंडोलकर, ‘श्री जिवदानी देवी संस्थान'चे विश्वस्त प्रणय नेरुरकर, विजय जोशी, आगाशी, विरार येथील ‘देवस्थान निधी मंडळ'चे अध्यक्ष माधव म्हात्रे, विश्वस्त कमलेश थोपटे, वसई येथील ‘दिवाणेश्वर महादेव मंदिर'चे प्रबंधक आचार्य जगदीश शास्त्री, दिवाणमान येथील ‘श्री हनुमान मंदिर'चे विश्वस्त हेमंत पाटील, ‘हिंदू जनजागृती समिती'चे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक तथा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ'चे संघटक बळवंत पाठक यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

२४ आणि २५ डिसेंबर २०२४ रोजी शिर्डी येथील श्री साई पालखी निवारा मध्ये झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद' मध्ये महाराष्ट्र राज्यातील ८७५ पेक्षा अधिक मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते. या परिषद मध्ये प्रामुख्याने मंदिरे तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती' करावी, काशी आणि मथुरा तीर्थत्रक्षेत्रांचा खटला जदलगती न्यायालयात चालवावा, सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करुन ती भक्तांच्या स्वाधीन करावीत, मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावा, मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त' होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी आणि राज्यातील मंदिरांच्या पुजाऱ्यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा, आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी ‘मंदिर महासंघ'चे राष्ट्रीय संघटक सुनील  घनवट यांनी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदाराचा जनसंवादासाठी अनोखा पुढाकार