अग्निशमन देवदुतांकडून २४ नागरिकांना जीवदान
भिवंडी : ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील सहा मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना ५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी अग्निशमन देवदुतांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवून २४ नागरिकांचा जीव वाचवला. यावेळी नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडत अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार व्यक्त केले आहे.
५ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ठाण्यातील कापूरबावडी येथील छबय्या पार्क मधील ए-१ या सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानकपणे भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले. तर या आगीच्या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
या आगीत इमारतीमधील तब्बल २४ नागरिक अडकले होते. याबाबतची माहिती इमारतीतील नागरिकांनी ठाणे अग्निशमन दलाला देताच बाळकुम अग्निशमन दल प्रमुख निलेश नारायण वेताळ, सहाय्यक केंद्र अधिकारी मनोज मारुती लोणे, चालक वाय. व्ही. पाटील, दामोदर राऊत, फायरमन संदीप महाले, दीपक बोहाडे, रविंद्र पाटील, सागर केणे, शिवाजी मेंगाळ आदिंचे पथक ४ अग्निशमन बंब, १ टँकर, १ उंच शिडीची गाडी घेऊन घटनास्थळी पोहोचले.
यानंतर अग्निशमन दलाने दीड ते दोन तास अथक प्रयत्न करुन सदर इमारतीतील पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर अडकलेल्या २४ नागरिकांची सुखरुप सुटका केली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून फक्त वित्तहानी झाली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन नंतर इमारतीतील नागरिकांनी अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.