चमत्कारामागील विज्ञानः अंनिसद्वारे प्रयोगाचे सादरीकरण
नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ६ जानेवारी रोजी इंदिरानगर-तुर्भ परिसरामध्ये अंगणवाडी सभागृहात चमत्कारामागील विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये पनवेल अंनिसचे साथी मनोहर तांडेल, बेलापूरच्या ज्योती क्षिरसागर, रबाळे येथील प्रा. अमोलकुमार वाघमारे, घणसोलीस्थित गजानंद जाधव यांनी सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक नवी मुंबई जिल्हा प्रधान सचिव प्रा. अमोल वाघमारे यांनी केले.मनोहर तांडेल यांनी पाण्याने दिवा पेटणे, मंत्राने अग्नी पेटणे, पेटता कापूर हातामध्ये खेळवणे व तोंडामध्ये टाकणे, पलिता पेटवून अंगाला लावणे, हात चलाखीने नोट काढणे असे प्रयोग उदाहरणसह प्रात्यक्षिक करून सादर केले. मुले व महिला यांनी यावेळी मनात येणारे प्रश्न विचारुन मनोहर तांडेल व ज्योती क्षीरसागर यांच्याकडून त्याची उत्तरे मिळवली. आभारप्रदर्शन गजानद जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम सानपाडा शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक अंकुश व सौ. अंकुश मॅडम तसेच टाटा पॉवर एनजीओच्या सुवर्णा भद्रे व ऐश्वर्या भद्रे यांच्या सहयोगातून पार पडला. सदर कार्यक्रमात सहभागी होऊन प्रात्यक्षिक करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशोक अंकुश यांच्या वतीने कंपास पेटी भेट देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमासाठी ४० महिला व ५० विद्यार्थी उपस्थित होते.