खारघर डोंगरावर बिबट्याचा वावर

खारघर : खारघर टेकडीवरील फणसवाडी, चाफेवाडी ग्रामस्थांना गेल्या आठ दिवसात अनेक वेळा बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे वन विभागाकडून ठोस उपाययोजना करुन बिबटयांना बंदिस्त करावे, अशी मागणी फणसवाडी, चाफेवाडी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

खारघर डोंगरावर गेल्या पंधरा वर्षात वन विभागाकडून रोप लागवड करण्यात आली आहे. तसेच वृक्ष तोडणाऱ्यावर वन विभागाकडून कारवाई केली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, झाडे मोठी झाल्यामुळे घनदाट जंगलाचे जाळे पसरले आहे. विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर, नवी मुंबई, रोहिंजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. बांधकामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबटा ,कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करीत असावेत, अशी चर्चा खारघर परिसरात सुरु आहे.

दरम्यान, खारघर डोंगरावरील फणसवाडी, चाफेवाडी पाड्यातील नागरिक खारघर आणि नवी मुंबई महापालिका मध्ये सफाई कामगार तसेच काही नागरिक नवी मुंबई आणि खारघर परिसरात अनेक ठिकाणी रोजंदारीवर काम करीत असल्यामुळे त्यांना दुचाकी तसेच पायवाटेने ये-जा करावी लागत आहे. काही कामगारांना रात्र पाळीवर जावे लागत आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसात फणसवाडी, चाफेवाडी पाड्यातील ग्रामस्थांना चाफेवाडी येथून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे फणसवाडी, चाफेवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी ठोस उपाययोजना करून बिबटयांना बंदिस्त करावे, अशी मागणी फणसवाडी, चाफेवाडी ग्रामस्थ करीत आहेत.

सीबीडी परिसरातील बहुतांश नागरिक सकाळी आणि संध्याकाळी खारघर, सीबीडी सेक्टर-५ येथून खारघर डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यावर चालण्यासाठी जात असतात. तर सुट्टीच्या दिवशी  खारघर, तळोजा परिसरातील नागरिक खारघर, पांडवकडा आणि सेक्टर-३५ लगत असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी जात असतात. डोंगरावर बिबट्या निदर्शनास आल्यामुळे नागरिकांनी एकटे न जाता मित्र, परिवार सोबत जावे, असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.  

खारघर डोंगरावर साळींदर, डुकर आदी प्राणी आहेत. त्यात गेल्या आठवड्यात बिबट्या पिलांसह निदर्शनास आला आहे. वन्य जीवांचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. विशेष म्हणजे डोंगरावरील पाड्यातील नागरिक उदरनिर्वाहसाठी सीबीडी आणि खारघर परिसरात ये-जा करतात. बिबटया निदर्शनास आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने फणसवाडी, चाफेवाडी पाड्यातील ग्रामस्थांना भेटू माहिती घेवून योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. - संजय घरत, माजी सरपंच - बेलपाडा.

खारघर डोंगरावर बिबट्या असल्याचे फणसवाडी, चाफेवाडी ग्रामस्थांकडून समजले. वन विभागाचे कर्मचारी सायंकाळी गस्त घालत आहेत. मात्र, वन विभाग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास बिबट्या आला नाही. बिबट्या निदर्शनास येताच योग्य ती उपाययोजना केली जाणार आहे. - गजानन पांढरपट्टे, वन परिक्षेत्र अधिकारी - पनवेल वन विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चमत्कारामागील विज्ञानः अंनिसद्वारे प्रयोगाचे सादरीकरण