भुर्जीपावच्या ऑनलाईन पेमेंटमुळे पोलिसाच्या हत्येचा छडा
प्रियकर, मामेभावाच्या मदतीने हत्या केल्याचे उघड
नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची हत्या, त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर तसेच मामेभावाने कट रचून घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी या हत्या प्रकरणात विजय चव्हाण याची पत्नी पुजा चव्हाण (३५), तिचा प्रियकर भूषण निंबा ब्राम्हणे (२९), मामेभाऊ प्रकाश उर्फ धिरज गुलाब चव्हाण (२३) आणि त्यांचा साथिदार प्रविण आबा पान पाटील (२१) या चौघांना अटक केली आहे. आरोपी प्रकाश चव्हाण याने ‘थर्टीफर्स्ट'च्या रात्री विजय चव्हाण यांना दारु पाजल्यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये तिघांनी त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यांनतर चव्हाण यांचा मृत्यू रेल्वे अपघातामध्ये झाल्याचे भासवण्यासाठी त्यांचा मृतदेह धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मृत विजय चव्हाण यांची पत्नी पुजा हिचे भूषण ब्राम्हणे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय चव्हाण अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिने काही दिवसांपूर्वीच आपला प्रियकर भुषण आणि मामेभाऊ प्रकाश यांची भेट घेऊन पतीच्या हत्येची योजना आखली होती. त्यानुसार प्रकाशने ३१ डिसेंबर रोजी सकाळी विजय चव्हाण यांना फोन करुन ‘थर्टीफर्स्ट'च्या पार्टीचा बेत आखला. त्यानुसार सायंकाळी विजय चव्हाण आणि प्रकाश या दोघे दारु प्यायले. त्यानंतर त्यांनी बाजुलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेल्या पुजाचा प्रियकर भुषण आणि त्याचा मित्र प्रविण या दोघांनी चव्हाण यांची गळा आवळून हत्या केली.
चव्हाण यांची हत्या केल्यानंतर तिघा आरोपींनी त्यांचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास ट्रान्स-हार्बर मार्गावरील रबाले आणि घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत झुडपात नेला. त्यानंतर पहिली लोकल येईपर्यंत तिघे मारेकरी तेथील झुडपात तब्बल ४ तास लपून बसले. यानंतर ठाणेहून पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांचा मृतदेह धावत्या लोकलसमोर ढकलून दिला होता. मात्र, सदर प्रकार मोटरमनच्या लक्षात येताच त्यांनी काही अंतरावर लोकल थांबवली. त्यानंतर मोटरमनने या प्रकाराची माहिती ‘रेल्वे'च्या नियंत्रण कक्षाला दिली होती.
त्यांनतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विजय चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ते पोलीस हवालदार असल्याचे आणि चव्हाण पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे आढळून आले. चव्हाण यांच्या शवविच्छेदनात त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाला सुरुवात केली. या तपासात विजय चव्हाण यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने तसेच पत्नीच्या मामेभावाने कट रचून विजय चव्हाण यांची हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी या हत्या प्रकरणात चौघांना अटक केली आहे.
२४ रुपयांच्या अंडाभुर्जीमुळे लागला छडा...
विजय चव्हाण यांच्या हत्या प्रकरणाबाबत रेल्वे पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, त्या दिवशी रात्रीच्या सुमारास विजय चव्हाण यांच्या गुगल पेवरुन घणसोलीत २४ रुपयांमध्ये भुर्जीपाव घेतल्याचा व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी घणसोलीतील भुर्जीपावच्या गाडीचे ठिकाण गाठले. त्यानंतर पोलिसांनी सद परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, विजय चव्हाण यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचा मामेभाऊ प्रकाश असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने सर्व घटनाक्रम सांगत हत्येची कबुली दिली.