वायू विद्युत प्रकल्पाकडे मुख्य अभियंत्यांचे दुर्लक्ष
उरण : उरण तालुक्यात गँस वर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प एकमेव सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातील ६ संचातून ६७२ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना या प्रकल्पाचे अकार्यक्षम मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सदर वायू विद्युत प्रकल्पातील नादुरुस्त असलेल्या ब्लाँक मधील २ बॉयलर आणि १ स्टीम टर्बाईन कडे वारंवार दुर्लक्ष केल्याने सध्या वीजनिर्मिती कमी होत आहे. परिणामी, सदर वायू विद्युत प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकल्पाची पाहणी करुन अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्यांच्या जागेवर कार्यक्षम मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
देशातील पहिले नैसर्गिक वायू पासून वीजनिर्मिती करणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प उरण तालुक्यात असून या प्रकल्पाची स्थापना १९८३-८४ साली करण्यात आली आहे. संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वायु विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ९५२ मेगावॉट होती. या प्रकल्पातील ६ संचातून ६७२ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र, काही वर्षांत गॅस पासून वीज निर्मित करणाऱ्या संचाची कार्यक्षमता या प्रकल्पात येणाऱ्या मुख्य अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कमी होत चालली आहे. त्यातच अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्यांमुळे आगी लागल्याच्या घटना बरोबर वीजनिर्मिती प्रकल्पात या अगोदर ९ आँक्टोंबर २०२२ रोजी मोठा स्फोट होऊन १ अभियंता, २ कामगार होरपळून मृत्यू पडल्याची आणि २ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. अशा प्रकारची दुदैवी घटना या प्रकल्पात घडल्यानंतर प्रकल्पातील मुख्य अभियंता मोहन आव्हाड मेंटेनन्स विभागातील कामगारांकडून सदर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. या प्रकल्पातील नादुरुस्त २ बाँयलर आणि १ स्टीम टर्बाईनच्या कामाकडे वारंवार दुर्लक्ष करत असतील, तर या प्रकल्पात २०२२ साली ज्या प्रकारे मोठा स्फोट झाला त्या स्फोटाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, अशी भिंती स्फोटाची तीव्रता अनुभवलेले कामगार तसेच परिसरातील रहिवाशी व्यक्त करीत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते असल्याने त्यांनी उरण तालुक्यातील वायू विद्युत केंद्र प्रकल्पाची पाहणी करून वीज पुरवठ्याअभावी १२ ऑवटोबर रोजी अंधारात गेलेल्या मुंबई शहराची वीजेची वाढती गरज लक्षात घेऊन सदर वायू विद्युत प्रकल्पात जास्तीत जास्त मेगावॉट वीजनिर्मिती कशाप्रकारे करता येईल, यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच वायू विद्युत केंद्र उरण या प्रकल्पाचे अकार्यक्षम मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची खाते निहाय चौकशी करावी. अन्यथा अकार्यक्षम अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे सदर प्रकल्पात २०२२ च्या स्फोटाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.
-ॲड. सत्यवान भगत, अध्यक्ष-उरण तालुका मनसे.