नवी मुंबईतील शिवप्रेमींची प्रतीक्षा संपुष्टात
वाशी : नेरुळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात येणार असून, शिवरायांचा पुतळा नवी मुंबईमध्ये दाखल झाला आहे. यासाठी ‘काशी कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट' तर्फे २०१६ पासून नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे शिवरायांचा पुतळा बसवण्याच्या शुभकार्याचा मुहूर्त ठरवून गुरुवर्य शिवसंत कृष्णाजी निवृत्ती पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात यावे, अशी मागणी ‘काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'चे संस्थापक-अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरुळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची स्थापना निर्विघ्न होवो यासाठी सिंहासनाधिष्ठ मुर्तीच्या स्थापनेच्या ठिकाणी १४ गडाच्या पवित्र जलाचा आणि मातीचे संकल्प पुजन होणे गरजेचे आहे.त्यासाठी होणारा खर्च ट्रस्ट स्वतः करण्यास इच्छूक आहे. सदर संकल्प पुजन श्रीक्षेत्र दुर्गराज किल्ले रायगडावरील महाराजांच्या पवित्र समाधीचे आणि सदरेवरील महाराजांच्या मूर्तीच पूजन गेली २५ वर्षे निस्वार्थी भावनेने करीत असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुवयातील गुरुवर्य शिवसंत कृष्णाजी निवृत्ती पाटील यांच्या हस्ते करण्याचा ‘ट्रस्ट'चा मानस आहे. त्यामुळे शिवरायांचा पुतळा बसवण्याच्या शुभकार्याचा मुहूर्त ठरवून गुरुवर्य शिवसंत कृष्णाजी निवृत्ती पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात यावे, अशी मागणी देवनाथ म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.