मानाच्या पालखीला पाचशे वादकांची मानवंदना

वाशी : नवी मुंबई शहराची मानाची पालखी अशी ख्याती प्राप्त झालेल्या ‘आई एकवीरा देवी'ची पालखी ५ जानेवारी रोजी नेरुळ येथील जुईनगर मधून कार्ला गडाकडे मार्गस्थ झाली. यावेळी नवी मुंबईतील जवळपास पाचशे पेक्षा अधिक ब्रास बँड वादकांनी आपल्या वादनाची सेवा देत ‘आई एकवीरा देवी' पालखीला मानवंदना दिली.

गावदेवी युवा मित्रमंडळ, जुईनगर या मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जुईनगर ते श्रीक्षेत्र आई एकविरा देवी मंदिर,कार्ला डोंगर दरम्यान पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गावदेवी मंदिरात आरती केल्यानंतर जुईनगर गावाला प्रदक्षिणा घालून ‘आई एकवीरा देवी' पालखी कार्ला गडाकडे मार्गस्थ झाली.

नवी मुंबई शहराची मानाची पालखी अशी ख्याती असलेल्या ‘आई एकवीरा देवी' पालखीचे यंदा तेरावे वर्ष असून, या पालखी सोहळ्यात नवी  मुंबईतील १५०० पेक्षा अधिक तरुण अधिकृत नोंदणी करुन मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सहभागी झाले आहेत. तर जवळपास ६० पेक्षा अधिक ब्रास बँड पथकातील ५०० पेक्षाअधिक वादकांनी एकाच सुरात गाणी वाजवून पालखीसाठी सेवा दिली. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह नवी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी पालखीला खांदा दिला. उद्या ७ जानेवारी रोजी पालखी कार्ला गडावर पोहोचणार असून, आई एकविरा मंदिर जवळ पालखी नाचवण्यात येणार असून, या ठिकाणी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात अनेक सुप्रसिध्द आगरी-कोळी गायकांसह रिल्स स्टार्स  हजेरी लावणार आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील शिवप्रेमींची प्रतीक्षा संपुष्टात