अनधिकृत इमारती सोडून शेडवर कारवाईसाठी आल्याचा राग
ठाणे : दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे कौसा येथील अनधिकृत शेडचे बांधकाम केलेल्या ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यानंतर घुगे यांना अब्दुल शहा आणि आलम शहा जहाँ खान यांनी धक्काबुकी करीत त्यांच्या कानशिलात पेटविल्याची घटना २ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहाय्यक आयुक्त घुगे यांनी डायघर पोलीस ठाण्यात दोघा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सहाय्यक आयुवत घुगे यांना मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली. तर सहाय्यक आयुक्त घुगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दिवा प्रभाग समिती नेहमीच अनधिकृत इमारतीचे बांधकाम, पाणी टंचाई, आरोग्य व्यवस्था आदि प्रकरणात वादग्रस्त ठरत आहे. त्यातच अनधिकृत इमारती सोडून शेडवर कारवाई करण्यास गेलेल्या दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना २ जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास अब्दुल शहा आणि आलम शहा जहाँ खान यांनी धक्काबुक्की करीत त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी घुगे यांना वाचवून गाडीत बसविले.
सदरचा प्रकार निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत असतानाच दुसरीकडे दिवा प्रभाग समितीत ८ माळ्याच्या तब्बल डझनभर इमारती अनधिकृतपणे उभ्या राहत असताना आणि तक्रारी आल्यानंतरही कारवाई न करता अनधिकृत शेडवर कारवाई करण्याची तत्परता दाखविल्याचा रागात सदरची धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
दिव्यात उभ्या राहताहेत डझनभर अनधिकृत इमारती...
दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत दिवा रेल्वे स्थानकाच्या बाजुलाच कोपरकडील दिशेला आणि मुंब्रा कडील दिशेला तब्बल १२ ते १५ अनधिकृत इमारती या राजरोसपणे उभ्या राहत आहेत. या अनधिकृत बांधकामावर अनेकांनी कारवाईची मागणी केलेली आहे. मात्र, दिवा प्रभाग समितीद्वारे बांधकाम माफियांच्या इमारतीवर कारवाईचे धाडस दाखविण्यात आलेले नाही. सहाय्यक आयुक्त घुगे यांना सादर बांधकामाची माहिती असतानाही कारवाई होत नाही. तर दुसरीकडे निवाऱ्यासाठी बांधलेल्या शेडवर कारवाई करण्यासाठी फौजफाटा घेऊन आलेल्या सहाय्यक आयुक्त घुगे यांची अब्दुल शहा आणि आलम शहा जहाँ खान यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. त्यात घुगे यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
अनधिकृत इमारती जमीनदोस्त करा; नागरिकांचा सूर..
दिव्यात पाण्यासाठी झालेल्या उपोषणात दिव्याला पाणी पुरत नाही. तर नागरिकांचे पाणी बांधकाम माफियांना पुरविण्यात येते असल्याचा आरोप करुन नागरिकांना पाणी देणार असाल तर अनधिकृत इमारती होऊ देऊ नका, असा सूर काढला होता. तर डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत शेडवर कारवाई करण्याची तत्परता दाखविण्यापेक्षा ५, ७ आणि ८ माळ्याच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा मारा, इमारती जमीनदोस्त करा, त्यानंतर छोट्या शेड सारख्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, असा सूर स्थानिक नागरिकांनी काढला.