वालधुनी नदीवरील नवीन पुलाच्या उद्घाटनास विलंब
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील धोकादायक पुल तोडून त्या ठिकाणी नवीन पुल तयार केला आहे. या पुलाचे उद्घाटन महापालिका प्रशासनाने केले नसल्याचा निषेध करीत ‘महाविकास आघाडी'च्या वतीने या पुलाचे उद्घाटन करुन त्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुल असे नामकरण करण्यात आले आहे.
उल्हासनगर कॅम्प-३ येथील संजय गांधी नगर ला जोडणारा वालधुनी नदीवरील पुल धोकादायक झाल्याने गेल्या अडीच वर्षापूर्वी महापालिकेने तोडून नवीन पुल उभारण्याचे काम धिम्या गतीने झाले असून दोनच महिन्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुलाचे उद्घाटन करण्यास महापालिकेला मुहुर्त मिळालेला नाही. दरम्यान, या पुलाचे उद्घाटन करुन सदर पुलाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नाव द्यावे, अशी नागरिकांची मागणी करण्यात आलेली आहे.
परंतु, महापालिका प्रशासनाला वेळ नसल्याने पुलाचे उद्घाटन, पुलाच्या कामाप्रमाणेच रेंगाळल्याने ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी नागरिकांच्या हस्ते ‘महाविकास आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांनी या पुलाचे उद्घाटन केले. तसेच सदर ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक लावण्यात आले.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने आता हेच नाव पुलाला देऊन मोठे फलक लावण्यात यावे, अशी मागणी ‘राष्ट्रीय'चे प्रवक्ते शिवाजी रगडे, उपशहर प्रमुख (उबाठा) भगवान मोहिते, विभागप्रमुख दशरथ चौधरी, आदिनाथ पालवे, अशोक जाधव, मॉन्टी राजपूत, शशी भूषण सिंग, साहेबराव ससाणे, मॅडी स्टलिन, साऊद खान, ॲड. महेश फुंदे, अझीझ शेख, सिराज खान यांनी केली आहे.