एसएससी सराव परीक्षेने विद्यार्थ्यांच्या मनात यशाचा आत्मविश्वास -माजी आमदार संदीप नाईक
नवी मुंबई : बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यशाचा आत्मविश्वास निर्माण केला, असे प्रतिपादन माजी आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.
संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित संदीप नाईक एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ संदीप नाईक यांच्या हस्ते तुर्भे येथील डॉ. डी. व्ही. सामंत विद्यालयामध्ये करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी एसएससी सराव परीक्षेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला दिशा देण्याचं काम केलं, असे गौरवोद्गार काढले.
नामदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उपक्रमाने यंदा 26 व्या यशस्वी वर्षात पदार्पण केले आहे. सराव परीक्षेच्या निकालातून विद्यार्थ्यांना आपल्या उणिवा लक्षात येतात. या उणिवा दूर करून विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने दहावीच्या मुख्य परीक्षेला सामोरे जात घवघवीत यश प्राप्त करतात, असा आजवरचा अनुभव असल्याचे संदीप नाईक म्हणाले. परीक्षेचा अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसे करावे, उत्तरपत्रिका कशा सोडवाव्यात या सर्वांचा अनुभव बोर्डाच्या धर्तीवरील या एसएससी सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मिळतो, असे नमूद करून एसएससी सराव परीक्षा उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे संदीप नाईक प्रतिष्ठानचे सदस्य, पदाधिकारी आणि या उपक्रमात शैक्षणिक बांधिलकीने आपले मोलाचे योगदान देणारे शिक्षक व अन्य सर्व घटकांचे संदीप नाईक यांनी आभार मानले. भविष्यामध्ये काळानुरूप नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
practice makes man perfect हा यशाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
एसएससी सराव परीक्षा उद्घटनावेळी महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, जनसेवक विवेक पाटील, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटील, राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महादेव सुळे सर, माजी नगरसेवक राजेश शिंदे, हेमचंद्र म्हात्रे सर, सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कोळी सर, एफ. जी. नाईक कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडिक सर, सुनील पाटील सर, ठाकूर सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले तर आभार दत्तात्रेय घोडके सर यांनी मानले .
एसएससी सराव परीक्षेविषयी...
संदीप नाईक एसएससी सराव परीक्षा यावर्षी 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषा माध्यमांमधून बेलापूर विभागात 11 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. संपूर्ण नवी मुंबईमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले असून बेलापूर विभागात 5000 पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.