हवामान बदल, थ्रीप्स रोगामुळे आंबा पिकावर परिणाम
वाशी : हापूस आंब्याला मोहोर फुटण्याची वेळ आली असताना परतीचा पाऊस आला अन् त्यात कडाक्याची थंडी पडली. त्यामुळे आंब्याला अतिमोहोर फुटला असून, यामध्ये ७० ते ८० टक्के ठिकाणी फळधारणा झाली नाही. आता पुन्हा नव्याने आंब्याला मोहोर फुटला असल्याने फळधारणा पूर्ण होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात दाखल होणारा हापूस आंबा यंदा थोडा उशिराने दाखल होईल, अशी माहिती हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
विशेष चवीने खवय्यांना भुरळ घालणारा आंबा म्हणून हापूस आंब्याची ओळख आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील खवय्ये हापूस आंबा वाशी मधील एपीएमसी बाजारात दाखल होण्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली असून, हापूसआंबा संकटात अडकला आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे. परतीचा पाऊस, थ्रीप्स रोगाची लागण आणि कडक थंडी यामुळे जास्त मोहोर आला. त्यापैकी काही मोहोर गळून पडला तर काही ठिकाणी फळधारणा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणी खर्च दुप्पटीने वाढला असून, सुरुवातीच्या हापूस आंबा उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा हापूस आंबा उत्पादन घटेल, असे मत हापूस आंबा विक्रेत्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. हापूस आंब्याला तीन वेळा मोहोर लागतो. नोव्हेंबरमध्ये पहिला, डिसेंबर, जानेवारी महिन्यात दुसरा तर फेब्रुवारी महिन्यात तिसरा मोहोर लागतो. मात्र, पावसाने सुरुवातीच्या हापूस फळ धारणाला फटका बसला आहे. याशिवाय सुरुवातीचा कल जास्तीत जास्त हापूस आंबा उत्पादन होण्याचा कालावधी मानला जातो. परंतु, सुरुवातीला फटका बसल्याने हापूस आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. आता हापूस आंब्याचे पीक फळधारणा प्रक्रियेत आहे. त्यामुळे यंदा फेब्रुवारी महिन्यात सुरु होणारा हापूस आंबा हंगाम येत्या मार्च मध्ये सुरु होणार आहे, असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले.
औषध फवारणी खर्चात दुप्पटीने वाढ
परतीचा पाऊस, हवामान बदल, थ्रीप्स रोग आणि पावसाने फळधारणा प्रक्रियेत असलेला हापूस आंबा यंदा संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या उत्पादनात अतिमोहोर फुटला आणि बहुतांश फळधारणा झाली नाही. तसेच थ्रीप्स रोगामुळे मोहोर गळून पडला आहे. त्यामुळे हापूस बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांची वार्षिक आर्थिक घडी बारगळली आहे. आधी १५ ते २० दिवसांतून एकदा औषध फवारणी करावी लागत होती. मात्र, आता हापूस आंबा उत्पादन वाचविण्यासाठी दोन ते तीन वेळा फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे औषध फवारणी खर्च दुप्पटीने वाढला आहे, अशी माहिती हापूस आंबा विक्रेत्या व्यापाऱ्यांनी दिली.
देवगड मध्ये हापूस आंबा फळधारणा प्रक्रियेत होता. परंतु, हवामान बदल आणि कडाक्याची थंडी यामुळे जास्त मोहोर फुटला असून, ७० ते ८० टक्के हापूस आंबा फळधारणा झाली नाही.त्यात थ्रीप्स रोगामुळे फवारणी खर्च दुप्पट वाढला आहे. त्यामुळे पुढील कालावधीत थंडीच्या पोषक वातावरणावर हापूस आंब्याचे उत्पादन अवलंबून राहणार आहे. - ऋषी सावंत, हापूस आंबा शेतकरी- मालवण.