एपीएमसीतील ठेकेदारावर सानपाडामध्ये गोळीबार
नवी मुंबई : एपीएमसी मार्केट मधील कचरा उचलण्याचा ठेका घेणारे ठेकेदार राजाराम ढोके (४८) यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्थानकाजवळील सानपाडा डी-मार्ट समोर घडली. या गोळीबारात राजाराम ढोके यांना ४ गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. सानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या पथकाकडून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
या घटनेतील जखमी ठेकेदार राजाराम ढोके घाटकोपर येथे राहण्यास असून त्यांच्याकडे एपीएमसी मार्केट मधील कचरा उचलण्याचा ठेका आहे. ३ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास ढोके सानपाडा डी-मार्ट जवळ असलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयात कामानिमित्त आले होते. याचवेळी डी-मार्ट समोरील रस्त्यावर सिडको गृहनिर्माण प्रकल्पाच्या गेटसमोरच दुचाकीवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी यांच्याकडील रिव्हॉल्वर मधून ढोके यांच्यावर गोळीबार करत ५ ते ६ राऊंड फायर केले. यातील ४ गोळ्या ढोके यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरुन पलायन केले.
सदर घटनेची माहिती मिळताच सानापाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे, भुजबळ यांच्यासह इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच पोलिसांचे एव्हीडेन्स पथक यांनी घटनास्थळी पाहणी करुन आढावा घेतला. पोलिसांनी देखील तातडीने हल्लोखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.
जखमी ढोके यांचा एपीएमसी मार्केट मध्ये कचरा उचलण्याचा ठेका असून त्यातील वादातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. जखमी ढोके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.