‘नमुंमपा'तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ३ जानेवारी रोजी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, उपायुक्त किसनराव पलांडे, दिलीप नेरकर, संघरत्ना खिल्लारे, नयना ससाणे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, माजी नगरसेविका कमलताई पाटील, उषा भोईर, सुवर्णा पाटील, सायली शिंदे, लता मढवी, बाळकृष्ण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवनचरित्र आपल्याला प्रेरणा देणारे असून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यामुळे त्याचा वारसा जप्त आज सर्वच क्षेत्रात महिला आगाडीवर दिसतात. नवी मुंबई महापालिका तर्फे विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी काम केले जात असून नवी मुंबई महिलांना प्रोत्साहित करणारी अग्रणी महापालिका आहे, असे ना. गणेश नाईक म्हणाले.
सावित्रीबाईंनी संघर्ष करीत जिद्दीने स्विकारलेला शिक्षणाचा वसा सोडला नाही आणि शिक्षणातूनच प्रगती होते ते जाणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यामुळेच आज सर्वच क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिध्द केलेले दिसून येते, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या. तर नवी मुंबई महापालिका लोकाभिमुख प्रशासन राबविताना महिला विकासाकडे विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने मध्यमवर्गीय घरात मुलींना शिकवण्याची अनास्था लक्षात घेऊन महापालिका मुलींच्या दर्जेदार शिक्षणासाठी पुढाकार घेत असून यापुढील काळात महिला व बालिका विकासाचे आणखी आदर्शवत काम केले जाईल, असा विश्वास आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी विशेष व्याख्यात्या म्हणून उपस्थित महिलांशी संवाद साधताना सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा क्रांतीकारक बदल घडविणारी स्त्रीशक्ती म्हणून गौरव केला. यावेळी त्यांनी महिलांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात महिला-बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला संस्थेला दिला जाणारा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार' घणसोली येथील ‘आरीन फाऊंडेशन' या संस्थेला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि २१ हजार रक्कमेसह प्रदान करण्यात आला. तसेच महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धंकांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविले गेले. इतर विजेत्या स्पर्धकांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महिलांच्या उत्साही गर्दीत विष्णुदास भावे नाट्यगृह हाऊसफुल्ल होते.
स्पर्धा विजेतेः योगासन स्पर्धा- कविता नोर, माधुरी माने, रंजना भोर (प्रथम क्रमांक), नृत्य स्पर्धा- वैशाली शेवाळे, निलम शिंदे, तन्वी हिंदळेकर (प्रथम क्रमांक), गायन स्पर्धा- वर्षा लोकरे (प्रथम क्रमांक), निबंध स्पर्धा- सुवर्णा मिसाळ (प्रथम क्रमांक), पाककला स्पर्धा- ज्योती जोशी (प्रथम क्रमांक), सॅलेड सजावट स्पर्धा- सारिका जेधे (प्रथम क्रमांक), टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे- वनिता परब (प्रथम क्रमांक), रांगोळी स्पर्धा- (प्रथम क्रमांक) रिना मोरे (बेलापूर विभाग), नयना पाटील (नेरुळ विभाग), सुजाता इरशेट्टी (वाशी विभाग), निलम ठाकूर (तुर्भे विभाग), सारिका जेधे (कोपरखैरणे विभाग), रुपाली पाटील (घणसोली विभाग), राणी खुणे (ऐरोली विभाग), दिपीका सोनावणे (दिघा विभाग).