पदपथावर अतिक्रमण ; महापालिका तर्फे तोडक कारवाई

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, दुकानदारांवर, व्यावसायिकांवर १ जानेवारी रोजी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेप्रमाणे प्रभाग समिती ब कळंबोली प्रभाग क्रमांक-१० मध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी ‘पदपथ स्वच्छ मोहिम' राबविण्यात आली.

‘प्रभाग समिती ब कळंबोली'चे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती ब कळंबोली प्रभाग क्रमांक-१० मधील फुटपाथवरील सर्व आतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी महापालिका अतिक्रमण विभाग आणि मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तुरे, स्वच्छता निरीक्षक दिग्नेश भोईर, अमोल कांबळे, अमित जाधव यांच्यासह अतिक्रमण आणि स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते. ‘पदपथ स्वच्छ मोहिम' मध्ये फूटपाथवरील दुकानांच्या नावांचे बॅनर्स, अनधिकृत वाढविलेले शेड, दुकानांतील सामान, टायर्स आणि इतर सामान यावर कारवाई करुन सदर सामान जप्त करण्यात आले.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांवर, पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यावसायिकांवर तसेच अनधिकृत बॅनरर्सवरती महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून चारही महापालिका प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी