डीपीएस फ्लेमिंगो तलावातील पाणी अस्वच्छ
वाशी ; नवी मुंबई शहरातील नेरुळ येथील ३० एकर जागेतील डीपीएस पलेमिंगो तलावातील पाण्याचा प्रवाह अडवला गेल्याने तलावातील पाणी अस्वच्छ झाले आहे.याबाबत पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
डीपीएस तलावाची दुरवस्था पाहता वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती द्वारे यापूर्वी डीपीएस तलावास संरक्षित करावे म्हणून शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘सिडको'ला येथील पाणथळ जागा तसेच तलावात बाहेर आणि आत अखंडित पाण्याचा प्रवाह सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. मात्र, उच्चस्तरीय समिती द्वारे करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील तलाव मागील वर्षी सुकत चालला होता तसेच यंदाही तीच परिस्थिती आहे. पाण्याचा प्रवाह काही महिन्यांपासून बंद असल्याने शेकडो पलेमिंगो पक्षांना आकर्षित करणारा डीपीएस तलाव आता शेवाळ आणि चिखलाने भरला आहे. याबाबत ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांना योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे, अशी माहिती ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानाला पक्ष्यांचा धोका टाळण्यासाठी डीपीएस तलाव आणि एनआरआय, टीएस चाणक्य आणि पाणजे पाणथळ यांसारखी स्थलांतरित पक्ष्यांची ठिकाणे जतन करणे आवश्यक आहे. - बी. एन. कुमार, संचालक - नॅटकनेक्ट फाऊंडेशन, नवी मुंबई.