खारघर मधील हौसिंग सोसायटी स्वच्छतागृहात ‘कोल्हा'

खारघर : खारघर सेक्टर-१६ मधील वास्तुविहार सोसायटी आवारातील स्वच्छतागृहात कोल्हा लपून बसल्याचे  मुलांच्या निदर्शनास येताच मुलांनी पालकांना माहिती दिली. दरम्यान, सदर घटनेची  वन विभागाला माहिती प्राप्त होताच, तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वन विभाग कर्मचाऱ्यांनी सदर कोल्ह्याला पिंजरामध्ये जेरबंद करुन पनवेल परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात सोडले. सोसायटी स्वच्छतागृहात कोल्हा शिरल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री खारघर मधील वास्तुविहार केएच चार या सोसायटीत घडली.

खारघर मधील वास्तुविहार आणि सेलिब्रेशन या दोन हौसिंग सोसायटी खारघर सेक्टर-१६ मधील खाडीकिनारा लगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून खाडीकिनारा तसेच वन संपदेचा ऱ्हास होत असल्यामुळे वन्य जीवांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे सायंकाळी अंधार होताच भक्ष्याचा शोधात असलेले कोल्हे खारघर परिसरातील रस्ते आणि पदपथावर निदर्शनास येत आहेत. ३१ डिसेंबर रोजी  रात्री आठ वाजताच्या सुमारास खारघर सेक्टर-१६ मधील वास्तुविहार सोसायटीच्या आवारात मुले वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे खेळात मग्न होती. यावेळी बाहेरुन कोल्ह्याने येवून थेट वास्तुविहार सोसायटीच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहात  प्रवेश केल्याचे बाहेर खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास आले. याबाबत मुलांनी घर गाठून पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी  वास्तुविहार सोसायटी मधील रहिवासी आणि भाजप पदाधिकारी समीर कदम यांनी माहिती दिली. या माहितीची देखल घेऊन समीर कदम यांनी तात्काळ वन विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर माहिती दिली. त्यानंतर वन विभाग कर्मचारी जगदीश राक्षे, प्रवीण जैस्वाल, सागर माळी आणि खारघर मधील सर्पमित्र रघुनाथ जाधव आदींनी रात्री नऊच्या सुमारास वास्तुविहार सोसायटी आवारातील स्वच्छतागृहात लपलेल्या कोल्ह्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, खारघर परिसरातील खाडी किनारी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे वन्य जीवांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे सोसायटी आवारात शिरण्याची परिस्थिती कोल्ह्यावर उद्‌भवली, अशी चर्चा वास्तुविहार सोसायटी मधील नागरिकांमध्ये होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत होर्डींग, बॅनर्सवर कारवाई