मद्य तस्करांविरोधात ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'ची धडक मोहीम
१४.८० कोटींचा मुद्देमाल जप्त
ठाणे : ठाण्यात बनावट मद्य किंवा अबकारी कर चुकवून प्रतिबंध असतानाही महाराष्ट्रात आणून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे येथील ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'च्या पथकाने मद्य तस्करांचे कंबरडे मोडले आहे. या गोरख धंद्यात अडकलेल्या तस्करांवर ‘उत्पादन शुल्क विभाग'ने कारवाई करुन सन २०२४ या वर्षात विशेष मोहिमेद्वारे तब्बल ३,४२६ गुन्हे दाखल करुन २,३०९ आरोपींना अटक केली आहे. तसेच १४ कोटी ७९ लाख ९१ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. मागीलवर्षी मुद्देमाल जप्तीचा आकडा १२ कोटी २७ लाख ६५ हजार इतका असल्याने यंदा ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'ने धडक कारवाई केल्याचे चित्र आहे.
‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'च्या ठाणे येथील पथकाने सन २०२३ या वर्षात धडक कारवाई करीत तब्बल ३,३१३ गुन्हे दाखल करुन मद्याची तस्करी करणाऱ्या २,२२७ आरोपींना अटक केली आहे. तर १४ कोटी ७९ लाख ९१ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले. सन २०२३ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात यामध्ये दाखल केलेल्या ३,३१३ गुन्ह्यात तब्बल २,०८४ आरोपी प्रत्यक्षात सापडले. तर १,२२९ आरोपी बेवारस असून पथकाने वर्षभरात १२ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'च्या अधिकाऱ्यांनी दिली. यंदा जप्तीचा महसूल २ कोटींनी वाढल्याचे उपलब्ध आकडेवारी वरुन दिसत आहे.
बनावट आणि कर चुकवून राज्यात विक्री...
‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'च्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आणि कारवाईत मोठ्या प्रमाणात कोट्यवधींचे मद्य जप्त केले. सदरचे मद्य एकतर निर्मिती केलेल्या राज्याच्या व्यतिरिक्त इतर राज्यात विक्रीसाठी बंदी असणारे मद्य असते किंवा बनावट मद्य नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले असते. सदर तस्करीत मोठ्या प्रमाणात नफा होत असल्याने या मद्याची तस्करी करण्यात येते. महाराष्ट्रात अशा मद्य विकून शासनाला चुना लावणाऱ्या तस्करांवर पथकाची करडी नजर असते. माहिती काढून छापेमारी करुन सदर मद्यसाठा हस्तगत करण्यात येतो.
मद्य तस्कर लढवितात शक्कल...
मद्य तस्कर विविध राज्यातून कर न भरता महाराष्ट्रात मद्य वाहतूक करतात आणि विक्री करतात. यामुळे शासनाचा महसूल बुडतो. प्रतिबंधित मद्य एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करताना चेक पोस्ट, नाके यांना हुल्कलकावणी देत असतात. याच्यासाठी तस्कर गाड्यांमध्ये किंवा टँकरमध्ये विशेष कप्पे बनवून त्यातून चोरट्या मार्गाने मद्य महाराष्ट्रात आणले जाते. ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'ने वाहनांची तपासणी केल्यानंतर मद्य लपवून ठेवल्याचे समोर येते. केवळ ट्रक, टँकर, टेम्पो यांची तपासणी केल्यानंतर काहीच आढळत नाही. मात्र, कसून तपासणी केल्यानंतर वाहनात केवळ मद्याच्या बाटल्या लपविण्यासाठी तरतूद केल्याचे समोर येते.