सहभाग, सहकार्य हाच ‘नैना'च्या यशस्वीतेचा मंत्र
सीबीडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाची वेळ जवळ येत असताना, त्याच्या आसपासचे नैना क्षेत्र, गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या क्षेत्राच्या नियोजन आणि विकासाची जबाबदारी असलेल्या ‘सिडको'ने, विकास प्रक्रियेत जमीन मालकांशी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तथापि, वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनी नैना क्षेत्रातील अवैध बांधकामे आणि त्या संदर्भातील ‘सिडको'च्या धोरणांची चर्चा केली आहे. परिणामी, सिडको आणि अन्य भागधारकांमध्ये अवैध बांधकामांच्या कारणांमुळे काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असल्याचे ‘सिडको'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
या समस्यांचा सामना करण्यासाठी आणि योजनाबध्द विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी, ‘सिडको'ने आपल्या विविध विभागांना सक्रिय केले आहे, ज्यात नगर नियोजन, परिवहन नियोजन, बांधकाम परवाने, अभियांत्रिकी, भूमी-भूमापन आणि नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभागांचा समावेश आहे. नाविन्यपूर्ण नगर रचना परियोजना अंतर्गत लँड पुलिंग मॉडेल द्वारे मूळ जमिनीच्या ४० टक्के क्षेत्रफळाचे विकसित, अंतिम भूखंड जमीनमालकांना देण्यात येत आहेत. तसेच शक्य तितक्या विद्यमान संरचना जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सदरचा संवेदनशील उपक्रम, लोकांचे विस्थापन टाळण्यासाठी करण्यात आला आहे. नैना प्रकल्प, नगररचना परियोजनेच्या अनोख्या जमिनीच्या विकास मॉडेलवर आधारित असून याद्वारे गावकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या गरजांची संवेदनशीलतेने पूर्तता करतो. बहुतेक अंतिम भूखंड त्यांच्या मूळ ठिकाणी देण्यात आले आहेत, त्यामुळे विस्थापन होत नसल्याचे ‘सिडको'तर्फे सांगण्यात आले आहे.
नैना क्षेत्रात ९४ गावांचा समावेश असून त्यातील ९२ गावे पनवेल तालुक्यातील आणि २ उरण तालुक्यातील आहेत. या क्षेत्राकरीता सुसंयोजित विकास योजना ‘सिडको'ने तयार केली आहे. १० जानेवारी २०१३ पासून शासनाने अधिसूचित केलेल्या या क्षेत्रात कोणत्याही बांधकामासाठी नैना बांधकाम परवाना विभागाकडून पूर्व परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. याद्वारे योजनाबध्द विकास शक्य आहे. नगररचना परियोजनांच्या अंमलबजावणीला टप्प्याटप्प्याने विकसित करणे शक्य होत आहे.
नगररचना परियोजनांच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येत आहे. नगररचना परियोजना-१ आणि २ ला शासनाची अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे. नगररचना परियोजना-३ ते ७ ला प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे, तर नगररचना परियोजना ८ ते १२ साठी मसुदा योजनांकरिताा लवादांची प्रक्रिया सुरु आहे. या टप्प्याटप्प्यांच्या मंजुरीमुळे ‘नैना'च्या योजनाबध्द विकास दृष्टिकोनाची पुष्टी झाली आहे. नगररचना परियोजना-१ आणि २ साठी प्रॉपर्टी कार्ड वितरणासाठी तयार असून अंतिम भूखंडांचे हस्तांतरणही सोबतच शक्य आहे. जमीन मालकांच्या सहकार्यानेच प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीला चालना मिळू शकेल.
काही बांधकामे नियोजित आरक्षित क्षेत्रात येत आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ‘सिडको'ने नगररचना परियोजना-२ च्या प्रस्तावित रस्त्याच्या भागातील १६ बांधकाम धारकांना चौकशी पत्रे जारी केली आहेत. ज्यात बांधकामासंदर्भातील आवश्यक कायदेशीर परवानग्या सादर करण्याची विनंती केली आहे. यातून या भागातील विकासाला कायदेशीर चौकटीत आणि पारदर्शक पध्दतीने सुव्यवस्थित करण्यासाठी सिडको कटीबध्द आहे.
नैना क्षेत्रातील एकात्मिक पायाभूत सुविधा विकास लवकरच सुरु होणार आहे. मात्र, जमीन मालकांच्या सहकार्यानेच निर्धारित क्षेत्रात प्रवेश शक्य आहे. योजनाबद्ध आणि व्यवस्थित विकासाच्या दीर्घकालीन फायद्यांचा विचार करता सर्वांनी एकत्र येऊन यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सर्व भागधारकांना ‘सिडको'तर्फे करण्यात आले आहे.
‘सिडको'च्या सक्रिय धोरणांद्वारे आणि स्थानिक समुदायांसोबतच्या सहकार्यातून, नैना क्षेत्रासाठी एक रुपांतरकारी भविष्य घडवण्याची दृष्टी आहे. सहयोगी वातावरण तयार करणे आणि एकात्मिक विकास धोरणांचे पालन करणे याच्या माध्यमातून नैना प्रकल्पाला एक शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरी विकासाचे मॉडेल बनवण्याचे उद्दिष्ट आहे.